Accident Editor Choice Hingoli dist

भरधाव कार व हायवा ट्रकची समोरासमोर धडक; कार चालक ठार

दिशा न्युज मराठी २४×७
हट्टा प्रतिनिधी;
हट्टा येथून जवळ असलेल्या वसमत–परभणी रोडवरील झिरो फाटा परिसरातील वर्मा पेट्रोल पंपाजवळ दि.२९ मार्च (रविवार) रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.भरधाव कार आणि हायवा ट्रकची समोरासमोर धडक होऊन कार चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार,नांदेडहून परभणीकडे जाणारी कार (MH 26 CE 2369) आणि परभणीकडून नांदेडकडे जाणारा हायवा ट्रक (MH 26 H 5526)यांच्यात जोरदार धडक झाली.संबंधित हायवा ट्रक हा वीटभट्टीसाठी माती घेऊन जात होता,अशी प्राथमिक माहिती आहे.
या भीषण अपघातात कारचा अक्षरशःचक्काचूर झाला आहे.धडक इतकी जबरदस्त होती की,कार चालकाचा जागीच तडफडून मृत्यू झाला.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत कारमधील चालकाला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान,कार चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात हायवा ट्रक पलटी झाला,अशीही माहिती समोर आली आहे.अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून,संबंधित ट्रक हा वसमत येथील एका वीटभट्टी चालकाचा असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम जाधव व कर्मचारी ताम्रध्वज कासले,कवठेकर,गवळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास हट्टा पोलीस करत आहेत.

Featured

Advertisement

Advertisement