Editor Choice Hingoli dist Maharashtra

इंधन पुरवठा कायम ठेवण्यासाठी निर्बंध लागु.

अफवांवर विश्वास ठेवू नका आवश्यकतेनुसारच इंधन घ्या — जिल्हाधिकारी -राहुल गुप्ता

हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचे समोर आले आहे.त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यात तात्पुरता असमतोल निर्माण झाला असून,परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने काही तातडीचे निर्बंध लागू केले आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी,हिंगोली यांनी जनहित लक्षात घेऊन अत्यावश्यक वस्तू अधिनियम,१९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार,दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत,तर तीनचाकी व चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त २००० रुपयांपर्यंतच इंधन देण्यात येणार आहे.
तसेच कॅन,बाटली,ड्रम किंवा इतर कोणत्याही साठवणुकीच्या भांड्यात इंधन भरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि पुरवठा सर्वसामान्यांसाठी सुरळीत राहावा,यासाठी हे निर्बंध लावण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक गर्दी आणि रांगा टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचे आवाहन केले आहे.याशिवाय रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्याच्या स्पष्ट सूचना पेट्रोल पंप चालकांना देण्यात आल्या आहेत.
या आदेशानुसार,प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध शिल्लक साठा,त्या दिवशी प्राप्त झालेला साठा आणि दररोज मागणी केलेला साठा याची माहिती ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सर्व पेट्रोल पंप मालकांनी या आदेशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून,आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम,१९५५ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत,जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरून इंधन साठवण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केले आहे.
दुचाकीला जास्तीत जास्त ₹२०० इंधन
तीनचाकी/चारचाकीला जास्तीत जास्त ₹२००० इंधन
कॅन,बाटली,ड्रममध्ये इंधन भरण्यास बंदी
रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांना प्राधान्य
प्रत्येक पंपावर साठ्याची माहिती फलकावर दर्शविणे बंधनकारक

Featured

Advertisement

Advertisement