वसमत नगरपरिषदेच्या विशेष सभेत पाचही विषयांना एकमताने मंजुरी
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
वसमत नगरपरिषदेची विशेष सभा शुक्रवार,दि.३१ जुलै रोजी नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात नगराध्यक्षा सौ.सुनीता बाहेती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या विशेष सभेत नगरपरिषदेच्या विकासाशी संबंधित एकुण पाच महत्त्वपुर्ण विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.
या सभेत नगरपरिषदेच्या मालकीच्या सती पांगरा तलाव परिसराचा पर्यटनस्थळ म्हणुन विकास करण्याच्या दृष्टीने त्यास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबत तसेच तलाव व सभोवतालच्या परिसरात विविध विकासकामे करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.पर्यटनाच्या दृष्टीने परिसराचा विकास करून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
तसेच नगरपरिषद हद्दीत बीओटी (BOT) तत्त्वावर सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करण्याबाबतच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.याशिवाय नगरपरिषद हद्दीतील शासकीय गोदाम,सर्वे क्रमांक १४७ मधील आरक्षणात बदल करून व्यावसायिक आरक्षण करण्याबाबतच्या विषयावरही चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ तसेच इतर योजनांतर्गत प्रस्तावित शासकीय कामांना मंजुरी देण्याबाबतचा विषयही सभेसमोर ठेवण्यात आला. त्यासोबतच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत राज्यस्तरावरील पाणीपुरवठा योजना व रस्ते प्रकल्पांसाठी नगरपरिषदेचा स्वहिस्सा भरण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर सभागृहाने पाचही ठराव एकमताने मंजुर केले.
या विशेष सभेस माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार,माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान,तसेच नगरपरिषदेचे सदस्य सचिन दगडु,शेख हबीब शेख बशीर,मुजाहिद खान पठाण,कट्टेकर, दीपक,रत्नाकर अडसिरे,कुरेशी आयशा बेगम,नावंदर मयुर,सारिका हळवे,एंगडे राजकुमार,सौ.जयमाला गोरे,स्नेहा मनोहरे,दिलीप भोसले,महंमद आयफान चाऊस,महिला सदस्य उत्कर्षा बाहेती,भोसले रुक्मीणीताई,आवटे मॅडम,डॉ.रेणुका पतंगे,राजेश पवार,नय्युम पाशा,कामरान मोहम्मद युनूस,प्रभाकर क्षीरसागर आदी उपस्थित होते.
सभेस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.सभेदरम्यान मांडण्यात आलेल्या सर्व विषयांवर सदस्यांनी सकारात्मक चर्चा करून एकमताने मंजुरी दिल्याने वसमत शहरातील विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सभेच्या शेवटी नगराध्यक्षा सौ.सुनीता बाहेती यांनी विशेष सभेस उपस्थित राहुन सर्व विषयांना सहकार्य केल्याबद्दल नगरपरिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानले.














Add Comment