वसमत शहरात २० ते २२ ऑक्टोबर दरम्यान दुर्गादेवी मुर्तींचे विसर्जन,नगरपरिषदेची तयारी पुर्ण
दोन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था,वेळेचे काटेकोर पालन करण्याचे नगरपरिषद प्रशासनाचे आवाहन
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत
वसमत नगरपरिषदेच्या वतीने नवरात्र दुर्गादेवी महोत्सव २०२६ च्या विसर्जनाची तयारी पुर्ण करण्यात आली आहे.वसमत शहरात यंदा सुमारे ७० ठिकाणी दुर्गादेवी मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असुन,विजयादशमीच्या दिवशी बहुतांश मंडळांकडुन मुर्तींचे विसर्जन करण्यात येते.मात्र,काही दुर्गादेवी मंडळांकडुन उशिरा विसर्जन केले जात असल्याने अशा मंडळांच्या सोयीसाठी नगरपरिषदेने विशेष व्यवस्था केली आहे.त्यानुसार दि.२० ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत काही मंडळांच्या दुर्गादेवी मुर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
विसर्जनासाठी नगरपरिषदेच्या पुर्णा प्रकल्प (एरिकेशन) वसाहतीमधील विहिरी आणि दगडगाव रस्त्यावरील खदान ही दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.या ठिकाणी मुर्ती विसर्जनासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत असुन,विसर्जन प्रक्रिया शांततेत,शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाकडुन नियोजन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या सुचनेनुसार,पुर्णा प्रकल्प वसाहतीमधील विहिरीत जास्तीत जास्त चार फुट उंचीपर्यंतच्या दुर्गादेवी मुर्तींचे विसर्जन करता येणार आहे.तसेच दगडगाव रस्त्यावरील खदान येथेही चार फुट उंचीपर्यंतच्या मुर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे संबंधित दुर्गादेवी मंडळांनी आपल्या मुर्तीच्या उंचीनुसार निश्चित केलेल्या विसर्जनस्थळाचा वापर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
विसर्जन प्रक्रियेदरम्यान शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी नगरपरिषदेने वेळेचे बंधन घातले आहे.दि.२० ते २२ ऑक्टोबर या कालावधीत निश्चित केलेल्या विसर्जनस्थळांवर दुपारी ३ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंतच दुर्गादेवी मुर्तींचे विसर्जन करता येणार आहे.सर्व दुर्गादेवी मंडळांनी या वेळेचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
विसर्जनाच्या ठिकाणी नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये,यासाठी नगरपरिषदेच्या वतीने पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यात येत आहे.तसेच बॅरिकेटिंग करून सुरक्षित मार्गांची व्यवस्था करण्यात येणार आहे.विसर्जनस्थळी जीवितरक्षक पथक,अग्निशमन दल आणि मोठ्या मुर्ती उचलण्यासाठी क्रेनसह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे विसर्जन प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडण्यास मदत होणार आहे.
निर्माल्य पाण्यात टाकु नका,स्वतंत्र संकलनाची व्यवस्था
दुर्गादेवी मुर्तींच्या विसर्जनावेळी निर्माल्य थेट पाण्यात टाकल्यामुळे जलप्रदूषण होण्याची शक्यता असते.हे टाळण्यासाठी नगरपरिषदेने विसर्जनस्थळी निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नागरिकांनी फुले,हार आणि अन्य निर्माल्य पाण्यात न टाकता नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य संकलन गोळ्यात जमा करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या हिंगोली जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची उपलब्धता आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा,असे आवाहनही नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचे संरक्षण,पाण्याची बचत आणि सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विसर्जन प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व दुर्गादेवी मंडळांनी नगरपरिषदेच्या सुचनांचे पालन करावे.तसेच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून निर्माल्य संकलन,सुरक्षितता आणि स्वच्छतेबाबत जागरूकता दाखवावी,असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर आणि नगराध्यक्ष सौ.सुनीता मनमोहन बाहेती यांनी दुर्गादेवी मंडळांना केले आहे.














Add Comment