गणेशोत्सव व पोळा सणानिमित्त वसमत शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न.
गणेश मंडळांनी परवाना घेणे बंधनकारक,डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
आगामी गणेशोत्सव व पोळा सणाच्या पार्श्वभुमीवर वसमत शहर पोलीस ठाण्यात सोमवार,दि.७ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली.गणेशोत्सवाच्या काळात शहरात शांतता,सुव्यवस्था व सामाजिक सलोखा कायम राहावा,या उद्देशाने आयोजित बैठकीस गणेश मंडळांचे पदाधिकारी,अध्यक्ष,व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार तसेच विविध समाजबांधव उपस्थित होते.
वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत आगामी गणेशोत्सव व पोळा सणाच्या नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन केले.
गणेश मंडळांनी मंडळाची स्थापना करण्यापुर्वी आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे.तसेच गणेशोत्सवातील देखावे व मिरवणुका शासनाने घालुन दिलेल्या नियमांनुसार,योग्य वेळेत व शिस्तबद्ध पद्धतीने काढाव्यात,अशा सुचना पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी दिल्या.
मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. कोणत्याही मंडळाकडुन कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कृत्य होऊ नये,तसेच उत्सवाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागु नये,याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी,असे आवाहन त्यांनी केले.
न्यायालयीन नियमांचे पालन करण्याचे आवाहन
गणेशोत्सव व पोळा सण आनंदाने व उत्साहाने साजरा करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच मा.न्यायालयाने घालुन दिलेल्या ध्वनिप्रदुषणविषयक नियमांचे पालन करून डीजेमुक्त सण साजरा करावा,असे आवाहन बैठकीदरम्यान करण्यात आले.
नागरिकांनी मांडल्या समस्या
बैठकीत उपस्थित नागरिकांनी नगरपालिका व महावितरण विभागाशी संबंधित विविध समस्या मांडल्या.सणाच्या काळात नागरिकांना होणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या.संबंधित विभागांनी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही आवाहन करण्यात आले.
आगामी गणेशोत्सव व पोळा सण शांततेत,उत्साहात व सामाजिक सलोखा राखुन पार पडावा,यासाठी सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी केले.














Add Comment