Editor Choice Good working Hingoli dist

वसमत विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीत २७,७५९ मतदारांची नावे वगळली

वसमत विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीत २७,७५९ मतदारांची नावे वगळली

दिशा न्युज मराठी २४×७,

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

१९,२०,२६ व २७ सप्टेंबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे

विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ अंतर्गत ९२-वसमत विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.पुनरीक्षणापुर्वी मतदारसंघात ३ लाख १७ हजार ९७९ मतदार होते.प्रारूप मतदार यादीत ही संख्या २ लाख ९० हजार २२१ इतकी झाली असुन,एकुण २७ हजार ७५९ मतदारांची नावे विविध कारणांमुळे प्रारूप यादीत समाविष्ट होऊ शकलेली नाहीत.

भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांच्या गणना प्रपत्रांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली.तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे.या प्रक्रियेनंतर मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३२७ वरून ३३९ झाली आहे.

प्रारूप यादीतील आकडेवारीनुसार मतदारसंघात सध्या १ लाख ५० हजार ५५३ पुरुष, १ लाख ३९ हजार ६६४ महिला आणि ४ तृतीयपंथी मतदार आहेत.मागील यादीच्या तुलनेत लिंग गुणोत्तर ९५२ वरून ९२८ झाले आहे.ज्येष्ठ नागरिक मतदारांची संख्या ४ हजार ३१८ वरून ४ हजार १७ इतकी झाली असून दिव्यांग मतदारांची संख्या २ हजार ३१२ वरून २ हजार १४६ झाली आहे.

मृत्यू,स्थलांतरामुळे मोठ्या प्रमाणात नावे वगळली

पूर्वीच्या मतदार यादीच्या तुलनेत प्रारूप यादीत समाविष्ट न झालेल्या मतदारांमध्ये ८ हजार १५१ मृत मतदार,३ हजार २०० स्थलांतरित अथवा सापडलेले नसलेले मतदार, तर १३ हजार ५०९ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.याशिवाय २ हजार ८५७ मतदारांची नावे अन्यत्र नोंदणीकृत असल्याचे आढळले असुन,इतर कारणांमुळे ४२ नावे समाविष्ट होऊ शकलेली नाहीत.अशा प्रकारे एकूण २७ हजार ७५९ मतदारांची नावे प्रारूप यादीतुन वगळली गेली आहेत.

दरम्यान,१८ ते १९ वर्षे वयोगटातील युवा मतदारांची संख्या मागील यादीतील ११ हजार ७८५ वरून प्रारूप यादीत केवळ ८ इतकी दिसत आहे.ही घट SIR प्रक्रियेदरम्यान या वयोगटातील गणना प्रपत्रांची पडताळणी व प्रारूप यादीत समावेशाची प्रक्रिया अद्याप पुर्ण न झाल्यामुळे झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असुन,अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईपर्यंत या आकडेवारीत सुधारणा अपेक्षित आहे.

९१.२७ टक्के गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन

वसमत विधानसभा मतदारसंघातील वितरित करण्यात आलेल्या ३ लाख १७ हजार ९७९ गणना प्रपत्रांपैकी २ लाख ९० हजार २२० म्हणजेच ९१.२७ टक्के गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.SIR प्रक्रियेअंतर्गत मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव किंवा इतर तपशिलात दुरुस्ती तसेच नाव वगळणीसाठी अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) अथवा तहसील कार्यालय,वसमत येथे सादर करता येणार आहेत.

तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पुर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिरे

मतदारांना दावे व हरकती दाखल करण्यासाठी प्रशासनाकडुन १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ या चार दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही शिबिरे सुरू राहणार आहेत.

या शिबिरांमध्ये संबंधित BLO नागरिकांकडुन नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच नाव वगळणीसंबंधी अर्ज स्वीकारणार आहेत.विशेषतःमहिला आणि दिव्यांग नागरिकांच्या समावेशनास प्राधान्य देण्यात येणार आहे.नवयुवक मतदारांच्या नोंदणीसाठी मतदारसंघातील शाळा व महाविद्यालयांमध्येही कार्यालयीन वेळेत स्वतंत्र विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

प्रशासनाने वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना प्रारूप मतदार यादीत आपले नाव, वय,पत्ता व इतर तपशील तपासण्याचे आवाहन केले आहे.मतदारांना आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर,तहसील कार्यालयात किंवा ECINET/भारत निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदार यादी तपासता येणार आहे.

प्रारूप यादीत नाव नसल्यास किंवा नाव,पत्ता अथवा इतर तपशिलात चुक आढळल्यास ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित BLO किंवा तहसील कार्यालय,वसमत येथे दावे व हरकती दाखल करता येतील.तसेच १९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष शिबिरांमध्येही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

प्राप्त दावे व हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांनी राष्ट्रीय महत्त्वाच्या या पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपली मतदार नोंदणी योग्य व अद्ययावत असल्याची वेळेत खात्री करून घ्यावी,असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी विकास माने यांनी केले आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement