लहान मुलांसाठी चहा म्हणजे पृथ्वीवरील विषासमान,सकस आहार देण्याचे आवाहन
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोराटे यांचे टेंभुर्णीतील सेवा संकल्प कार्यक्रमात मार्गदर्शन
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत
वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथे एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प,वसमत यांच्या वतीने दि.१४ ऑक्टोबर रोजी महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी हिंगोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोराटे यांनी बालकांच्या पोषणाचे महत्त्व विशद करताना,“चहा हे पृथ्वीवरील विष आहे. इंग्रजांनी फुकट चहा पाजुन लोकांना त्याची सवय लावली,”असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाची कार्यक्रमस्थळी विशेष चर्चा झाली.
कार्यक्रमाला बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका सोरेकर,पर्यवेक्षिका लखमोड, कौठेकर,पावडे व लोणसणे यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी,आरोग्य विभागाचे अधिकारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
मार्गदर्शन करताना बोराटे यांनी सांगितले की,पोषण म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे,तर शरीराला आवश्यक पोषक घटक मिळणे महत्त्वाचे आहे. आजकाल लहान मुले कुरकुरे आणि इतर जंक फुडचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खातात.त्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते,मात्र शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. परिणामी,आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांतील मुलांमध्येही कुपोषणाची समस्या दिसुन येते.
बालकांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करून जंक फूडचे सेवन कमी करावे,असे आवाहन त्यांनी केले.मोड आलेल्या धान्यांपासुन पीठ तयार करून त्यापासुन शिरा,लाडु आणि आप्पे यांसारखे पौष्टिक पदार्थ बनवावेत.हे पदार्थ लहान मुलांसह किशोरवयीन मुलींनाही द्यावेत, असे त्यांनी सांगितले.
‘आजची किशोरवयीन मुलगी ही उद्याची माता आहे,’असे नमुद करत त्यांनी मुलींच्या पोषणाकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.योग्य वयात सकस आहार मिळाल्यास भविष्यातील मातृ आरोग्य आणि बाल आरोग्य सुधारण्यास मदत होते,असेही त्यांनी स्पष्ट केले.
सेवा संकल्प कार्यक्रमाच्या माध्यमातुन ग्रामस्थांना विविध शासकीय सेवा,आरोग्य तपासणी आणि पोषणविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.महिला व बालकांचे आरोग्य,बालसंगोपन आणि सकस आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.














Add Comment