Articles • Editor Choice • Hingoli dist

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आदेश,चारा उपलब्धता वाढविण्यासह ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्यावर भर.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आदेश,चारा उपलब्धता वाढविण्यासह ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्यावर भर

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत 

वसमत तालुक्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर पाणी व चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना कराव्यात.प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १०० जलतारा प्रकल्प साठ्यांची निर्मिती करावी,तसेच ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीटंचाई उद्भवु नये,यासाठी दीर्घकालीन नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

दि.२१ ऑक्टोबर रोजी वसमत येथील पंचायत समिती सभागृहात ग्रामपंचायत अधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी तालुक्यातील पाणी उपलब्धता,संभाव्य पाणीटंचाई,पशुधनासाठी चारा नियोजन आणि टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भुजलपातळीत वाढ करण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य द्यावे.गावपातळीवर उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी आवश्यक कामे हाती घ्यावीत.प्रत्येक ग्रामपंचायतीने जलतारा प्रकल्प साठ्यांच्या निर्मितीवर भर देऊन संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासुनच तयारी करावी,अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

पाणीटंचाईसोबतच पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासु नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी.चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यासाठी कुरण लागवडीला प्रोत्साहन द्यावे.जिल्ह्याबाहेर चारा वाहुन नेण्यावरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी,तसेच चारा व्यवस्थापनासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देशही त्यांनी दिले.

पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी तलाठ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.गावांमधील पाणी उपलब्धता,संभाव्य टंचाईची परिस्थिती आणि स्थानिक अडचणी यावर नियमित लक्ष ठेवुन तातडीने उपाययोजना कराव्यात,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गावपातळीवरील पाणी व चारा टंचाईच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घ्यावी.टंचाईसंदर्भातील समस्यांचे तातडीने निराकरण करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे सादर करावा.प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा किंवा बैठकीला गैरहजर राहण्याचे प्रकार खपवुन घेतले जाणार नाहीत.बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल,असा इशाराही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला.

या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड,उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजु नरवाडे,गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटावाड,सहायक गटविकास अधिकारी जी.बी. बोथीकर,तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे,पशुसंवर्धन विभागाचे डॉ.इंगोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी व चारा व्यवस्थापनासाठी प्रशासनाने आतापासुनच उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन आणि संबंधित विभागांची प्रत्यक्ष कार्यवाही याकडे आता लक्ष लागले आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement