पळशी येथे लातुर एलसीबीच्या पोलीस पथकावर हल्ला,सहायक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत
आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या,लोखंडी रॉडने मारहाण,मिरचीची पुड फेकुन शासकीय वाहनाची तोडफोड.
वसमत तालुक्यातील पळशी येथे आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या लातुर जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस पथक व सोबत गेलेल्या हट्टा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची गंभीर घटना गुरुवार,दि. २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.या हल्ल्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने गंभीर जखमी झाले असुन,फिर्यादी पोलीस अधिकारी अमर सुरेश केंद्रे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद आहे.पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीची पुड फेकुन शासकीय वाहनाची दगडफेक करून तोडफोड करण्यात आल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पळशी येथील राजु मोहन शिंदे याला अटक करण्यासाठी लातुर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या घरासमोर गेले होते.त्यावेळी विकी मोहन शिंदे,सुदर्शन मोहन शिंदे,सचिन मोहन शिंदे,राजु मोहन शिंदे आणि इतर तीन ते चार महिला व पुरुषांनी एकत्र येत पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.संबंधितांनी काठ्या व लोखंडी रॉडचा वापर करून पोलिसांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या हल्ल्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांच्या डोक्यात मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले.तसेच फिर्यादी पोलीस अधिकारी अमर सुरेश केंद्रे यांनाही डोक्यात काठीने मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमुद आहे.पथकातील अन्य पोलीस अंमलदारांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.हल्लेखोरांनी पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीची पुड फेकल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
हल्ल्यादरम्यान पोलिसांच्या शासकीय वाहनावर दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीत वाहनाच्या काचा फुटून अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच हल्ला झाल्याने पोलिसांच्या सुरक्षिततेचा आणि शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या घटनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी पोलीस अधिकारी अमर सुरेश केंद्रे यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात चार नामनिर्दिष्ट आरोपींसह इतर तीन ते चार महिला व पुरुषांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.२९ ऑक्टोबर रोजी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे तसेच हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बसवंते यांनी घटनास्थळी भेट दिल्याची नोंद आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे करीत आहेत.दरम्यान,संबंधित आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.














Add Comment