Editor Choice Health & Fitness Vasmat city

पेशंटचं अर्ध दुखणं स्वतःच्या बोलण्याने कमी करणारा, वैद्यकीय क्षेत्रातील एक अवलिया डॉक्टर -डॉ.राम कुंटूवार

होमिओपॅथिची प्रॅक्टिस करणारा एम.बी.बी.एस.वाला
डॉ.राम कुंटुरवार म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व,एक अजब रसायन.डॉक्टर साहेबांनी एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या शाखांपैकी महत्त्वाची व वरची मानली जाणारी पदवी संपादन केलेली होती.पण या माणसाने ऍलोपॅथी सोडून होमिओपॅथीची प्रॅक्टिस वसमतमध्ये सुरू केली.मुळात हा माणूस अत्यंत गोड स्वभावाचा असल्यामुळे कदाचित तो लोकांना ऍलोपॅथीच्या कडू गोळ्या खायला देऊ शकला नसेल आणि म्हणून त्याने ही साबुदाण्याच्या गोड गोळ्यांची प्रॅक्टिस सुरू केली असावी.डॉक्टर साहेबाकडे पेशंटचं जाणं म्हणजे कुठल्यातरी एखाद्या मित्राला,आप्तस्वकीयाला भेटायला जाणं होतं.बाहेर वेटिंगमध्ये असलेल्या पेशंटला केबिनमधलं डॉक्टर आणि पेशंट बोलणं ऐकू यायचं!आपला नंबर कधी येईल याची वाट पाहणारा पेशंट ते सगळं बोलणं ऐकून हा विचार करायचा की या बोलण्याचा आणि आजारपणाचा काय संबंध? पण जेव्हा त्याचा नंबर यायचा तेव्हाही डॉक्टरांच्या केबिनमध्ये पुन्हा एकदा तसंच संभाषण सुरु व्हायचं.डॉक्टर साहेबांचा आवाज म्हणजे एवढा मृदू की ऐकतच राहावं.आणि त्यामध्ये मग त्यांचं विनोद करणं,हसणं,हसवणं हे सगळं आधी चालायचं मग कधीतरी जाता जाता आजाराविषयी चर्चा होणार.आजाराची चर्चा होण्याच्या पूर्वीच बोलण्यानं पेशंटचा अर्धा आजार कमी किंवा कधी कधी आपण आजारी आहोत हेच पेशंट विसरून गेलेला असायचा.
आधी पेशंटची सकाळपासून रात्री झोपेपर्यंत ची दिनचर्या डॉक्टर विचारून घेणार.एकदा आजार समजून घेतला की मग त्या गोळ्यांची छोटी बॉटल हाती घेणे,मग परत त्या गोळ्यांमध्ये होमिओपॅथीच्या औषधांचे मोजून पाच-पाच,दहा-दहा थेंब टाकणं.त्यानंतर अत्यंत लयबद्ध पद्धतीने एखादा विशिष्ट विधी केल्यासारखं त्या गोळ्यांची बॉटल हलवत हलवत ते औषधाचे थेंब आणि गोळ्या एकजीव करण.तिकडं साबुदाण्याच्या गोळ्यामध्ये ते औषध पाझरलेलं असायचं आणि अगदी तसंच डॉक्टर सुद्धा पेशंटच्या हृदयात उतरलेला असायचा.
आज दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या एका धक्क्याने ही प्रॅक्टिस थांबली.पण वसमतकरांच्या हृदयामध्ये आजही हा माणूस जिवंत आहे.

प्रा.डॉ.विशाल रावसाहेब पतंगे
सहयोगी प्राध्यापक
पदवी व पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग आणि संशोधन केंद्र,
पीपल्स कॉलेज,नांदेड.

Featured

Advertisement

Advertisement