प्रामाणिक व निष्ठावान सेवेमुळेच शिक्षक मोठे ठरतात – प्राचार्य डॉ.एम.एम.जाधव
हु.बहिर्जी महाविद्यालयात प्रा.डॉ.हेमंत उंडेगावकर यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख
महाविद्यालयात काही व्यक्ती पदांमुळे मोठ्या होत नाहीत,तर त्यांच्या स्वभावामुळे,कार्यामुळे आणि विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेल्या मूल्यांमुळे मोठ्या ठरतात.प्रा. डॉ.हेमंत उंडेगावकर यांनी आपल्या ३० वर्षांच्या अखंड, प्रामाणिक आणि निष्ठावान सेवेतुन याचाच आदर्श वस्तुपाठ घालुन दिला आहे.शिक्षणाला आणि शिक्षकाला कधीही सेवानिवृत्ती नसते,केवळ पगार घेऊन काम करणे आणि पगार न घेता काम करणे एवढाच त्यातील फरक असतो,”असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.एम.एम. जाधव यांनी केले.
दि.३० जुन रोजी हु.बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे प्रा.डॉ. हेमंत किसनराव उंडेगावकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.कार्यक्रमाला संचालक प्रा.अनिल नादरे,उपप्राचार्य डॉ.सुभाष क्षीरसागर,सत्कारमूर्ती प्रा.डॉ.हेमंत उंडेगावकर व सौ. उंडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालयातर्फे तसेच प्राध्यापक संघटनेतर्फे प्रा.डॉ.उंडेगावकर व त्यांच्या पत्नींचा शाल,वस्त्ररूपी आहेर,सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकानंतर डॉ.आर.एन.इंगळे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, उंडेगावकर सरांची ३० वर्षे ६ महिन्यांची सेवा आणि त्यांची कडक शिस्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.त्यांच्या गणित विषयाच्या प्रभावी अध्यापनामुळे घडलेले अनेक विद्यार्थी आज बँक,एलआयसी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करत आहेत.
यावेळी डॉ.बाबुराव खंदारे यांनी सरांच्या शांत,संयमी आणि अभ्यासु स्वभावाचा गौरव केला. प्रा.नंदकुमार सवंडकर,डॉ. रामभाऊ मुटकुळे,डॉ.अशोक कुलकर्णी आणि प्रबंधक डॉ. पांडुरंग बर्वे यांनीही प्रा.उंडेगावकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती प्रा.डॉ.हेमंत उंडेगावकर यांनी आपल्या ३० वर्षांच्या सेवाप्रवासातील आठवणींना उजाळा देत संस्थाचालक,संचालक,सहकारी प्राध्यापक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनिल मुगूटकर यांनी केले,तर आभार प्रदर्शन डॉ.प्रताप पाटील यांनी मानले.या गौरव सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने
उपस्थित होते.














Add Comment