इंजनगावातील वादग्रस्त जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर,अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त झेंडा उभारल्याने तणाव,प्रशासनाची मध्यस्थी
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
वसमत तालुक्यातील इंजनगाव (पश्चिम) येथील अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या वादग्रस्त जागेचा प्रश्न दि.०१ ऑगस्ट पुन्हा एकदा ऐरणीवर आला.मातंग समाजाच्या वतीने संबंधित जागेवर झेंडा उभारून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस व महसुल प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.जयंती कार्यक्रमात महिला,पुरुष,युवक तसेच लहान मुलांसह मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव सहभागी झाले होते.यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा,अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना,वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसीलदार सारंग चव्हाण,उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे,वसमत शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.सुधीर वाघ,वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांच्यासह महसुल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.प्रशासनाने दोन्ही बाजुंच्या प्रतिनिधींशी चर्चा करून वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केली.कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन सकाळपासुनच गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.राज्य राखीव पोलीस दल (SRPF) तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जलद कृती दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले होते.त्यामुळे संपुर्ण गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.प्रशासनाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात असुन गावात शांतता कायम आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडुन देण्यात आली.दरम्यान,वादग्रस्त जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासुन प्रलंबित असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा,अशी मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात आली आहे.तसेच मातंग समाजाच्या काही मागण्या शासन दरबारी मान्य होण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल,असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.पोलीस व महसुल प्रशासनाच्या समन्वयामुळे गावातील संभाव्य तणाव निवळुन शांतता राखण्यात यश आले.














Add Comment