Hingoli dist Maharashtra Social work

वसमत नगरपरिषद मालकीच्या सर्वे.नं.१८० भुखंड विक्री प्रकरणी बेमुदत लक्षवेधी आंदोलन

वसमत नगरपरिषद मालकीच्या सर्वे.नं.१८० भुखंड विक्री प्रकरणी बेमुदत लक्षवेधी आंदोलन

भु-माफिया,अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रशासनाने दखल न घेतल्यास विविध आंदोलनांचा इशारा

दिशा न्युज मराठी २४×७,

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

वसमत नगरपरिषदेच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक १८० मधील भुखंड विक्री प्रकरणी भु-माफिया तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत लक्षवेधी आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे क्रमांक १८० मधील म्यु.घर क्रमांक A 505/4 व A 505/5 या प्रत्येकी १३५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या मालमत्ता नगरपरिषदेच्या मालकीच्या आहेत. या मालमत्तांच्या रिव्हिजन नक्कलीनुसार, दि.१९ मे २०१९ रोजी खासगी व्यक्तींची नावे मालकीच्या रकान्यात नोंदविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.या नोंदींची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

तसेच,शेख एजाज शेख दादामिया यांनी दि.२३ जुलै २०२४ रोजी घर क्रमांक A 505/4 ही मालमत्ता देवानंद बाबाराव साबळे यांना ११ लाख ७ हजार रुपयांना विकली.त्यानंतर संतोष जगदीश नागेश्वर यांनी २६ जुलै २०२४ रोजी घर क्रमांक A 505/5 ही मालमत्ता मंगेश नंदकिशोर पारवेकर यांना याच किंमतीत विकली.पुढे २३ मे २०२६ रोजी दोन्ही मालमत्तांची शेख आसिफ शेख फारुख यांना विक्री करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

दोन्ही मालमत्तांचे वेगवेगळे घर क्रमांक,क्षेत्रफळ व चतु:र्सीमा असतानाही,विक्री व्यवहारात पुर्वीच्या खरेदीदारांचा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे.या व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

दुय्यम निबंधकांच्या भुमिकेचीही चौकशी करण्याची मागणी

रिव्हिजन नक्कल हा मालकी हक्काचा अंतिम पुरावा नसुन करआकारणीसाठी असलेल्या इमारत व जमिनीची सुची आहे,असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.असे असताना वसमत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक ३३३९/२०२४ व ३२६३/२०२४ नुसार खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करण्यात आली.या व्यवहारांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची भुमिका तपासावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच,नगरपरिषदेचे कर प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मसाजी जाधव यांनी २४ जुन २०२६ रोजी वसमत शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्हा क्रमांक ४१७/२०२६ मधील फिर्याद खोटी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करत,या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

दस्त क्रमांक ३२६३/२०२४, ३३३९/२०२४ व २५८०/२०२६ नुसार झालेले खरेदी-विक्री व्यवहार व नामांतर रद्द करून भुखंड सीज करावेत.

संबंधित भु-माफियांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करावी.

सरकारी जमिनीच्या रिव्हिजन नोंदीत खासगी व्यक्तींची नावे नोंदविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहआरोपी करून निलंबित करावे.

मालकी हक्काचे सबळ पुरावे नसताना दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांची चौकशी करावी.

गुन्हा क्रमांक ४१७/२०२६ मधील फिर्यादी ज्ञानेश्वर जाधव यांनी खोटी फिर्याद दिल्याच्या आरोपाची चौकशी करावी.

बनावट सही व शिक्क्याच्या प्रकरणातील सत्यता बाहेर आणण्यासाठी संबंधितांची नार्को टेस्ट करावी.

सर्व्हे क्रमांक १८० व त्याच्या सर्व पोटहिस्सा जमिनींच्या मागील व्यवहारांची,महसुली नोंदी,नामांतर व फेरफारांची एसआयटीमार्फत चौकशी करावी.

प्रशासनाने या मागण्यांची वेळीच दखल न घेतल्यास दररोज वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे व पत्रकार मुनीरोद्दीन फारुखी यांनी दिला आहे.यामध्ये हलगी बजावणे,थाळीनाद,ढोल-ताशे वाजविणे,बोंबाबोंब,भजन-कीर्तन तसेच तिरडी आंदोलनाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement