SIR अंतर्गत नोटीस मिळालेल्या मतदारांना कार्यालयात जाण्याची गरज नाही- विकास माने,उपविभागीय अधिकारी वसमत.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
३,४,१० व ११ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे
विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत नोटीस मिळालेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मतदार नोंदणी कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही,अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली.
वसमत तहसील कार्यालयात दि.०१ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी SIR प्रक्रियेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की,मतदार यादीतील नावाची जुळवणी न झालेल्या अथवा जुळवणीमध्ये तार्किक विसंगती आढळलेल्या मतदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी संबंधित बीएलओ मतदारांच्या घरी भेट देणार आहेत.बीएलओमार्फत आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच संबंधित मतदारांना आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन किंवा व्हॉट्सॲपद्वारे सादर करता येणार आहेत.केवळ अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाइन सुनावणी घेण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान,SIR अंतर्गत दावे व हरकती सादर करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यानुसार ३, ४, १० व ११ ऑक्टोबर रोजी वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.नवमतदार तसेच मतदार यादीत नाव नोंदवु इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरांचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.
मतदार यादीतुन एखाद्या मतदाराचे नाव वगळण्यापुर्वी संबंधित मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची पुरेशी संधी देणे आणि आवश्यक त्या प्रक्रियेनुसार सुनावणी घेणे बंधनकारक आहे.पात्र नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहु नये,यासाठी प्रशासनाकडुन आवश्यक दक्षता घेतली जात असल्याचे विकास माने यांनी सांगितले.
SIR अंतर्गत नोटीस मिळालेल्या मतदारांनी घाबरून जाण्याचे कारण नसुन,त्यांनी आपल्या संबंधित बीएलओशी संपर्क साधुन आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी,असे आवाहनही मतदार नोंदणी अधिकारी विकास माने यांनी केले.
अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.














Add Comment