वसमत शासकीय स्त्री रुग्णालयाची जिल्हा शल्यचिकीत्सकांनी केली पाहणी सेवा सुविधांचा आढावा घेत दिले महत्त्वाचे निर्देश.
शासकिय सेवा कमी व स्वतःच्या क्लिनिकला जास्त प्राधान्य देणारे डॉक्टर,साहेबांच्या दौऱ्यामुळे पुर्णवेळ स्त्री रुग्णालयात.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक : गिरीष देशमुख
हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) डॉ.नितीन तडस यांनी शुक्रवार दि.१० जुलै रोजी शासकीय स्त्री रुग्णालय वसमत येथे भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली.या दौऱ्यापुर्वी रुग्णालय प्रशासनात मोठी लगबग सुरू झाली होती.स्वच्छता,बंद असलेल्या काही सुविधा सुरू करणे आणि सर्व विभाग अद्ययावत ठेवण्याची धावपळ दिवसभर सुरूअसल्याचे चित्र दिसुन आले.
वरिष्ठ अधिकारी येणार असल्याची पुर्वसुचना मिळाल्यानंतर रुग्णालय परिसराची युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात आली
सर्व डॉक्टर,परिचारिका व कर्मचाऱ्यांनां वेळेवर हजर राहण्याच्या सुचना वरिष्ठांकडुन देण्यात आल्या होत्या.
एरवी अस्वच्छता व अपुऱ्या सुविधांबाबत तक्रारींमुळे चर्चेत असलेले रुग्णालय एका दिवसात बदललेले दिसत असल्याने रुग्णांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
डॉ.नितीन तडस यांनी विविध विभागांना भेट देऊन आरोग्य सेवा,उपलब्ध सुविधा आणि प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला.त्यांच्या उपस्थितीमुळे सकाळपासुन सुरू असलेल्या चर्चांना पुर्णविराम मिळाला.
मात्र या दौऱ्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.वरिष्ठ अधिकारी येणार असल्यामुळेच रुग्णालयात स्वच्छता,शिस्त आणि सेवा तत्परतेने उपलब्ध होत असतील,तर सामान्य रुग्णांसाठी ही व्यवस्था रोज का दिसुन येत नाही,असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
याशिवाय काही डॉक्टर शासकीय सेवेत अपेक्षित वेळ न देता खासगी क्लिनिकमध्ये अधिक वेळ घालवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.या पार्श्वभुमीवर वसमत उपजिल्हा रुग्णालय व वसमत शासकीय स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांनी पुर्णवेळ शासकीय सेवेला प्राधान्य द्यावे,अशी मागणीही होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यानिमित्त दिसुन आलेली शिस्त,स्वच्छता आणि सेवा भविष्यातही कायम राहते का, तसेच रुग्णांना रोज दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतात का,याकडे आता वसमत तालुक्यातील नागरिकांची लक्ष लागले आहे.














Add Comment