हु.बहिर्जी विद्यालयाचे तालुकास्तरीय मैदानी व हॉलीबॉल स्पर्धेत घवघवीत यश
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय मैदानी व हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला.या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली असुन विद्यार्थी,शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत १४ वर्षे मुले या वयोगटात १००,२००,४००,६०० मीटर धावणे तसेच रिले या सर्व प्रकारांत बहिर्जी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.तसेच १७ वर्षे मुले या वयोगटात १००, ४०० व ८०० मीटर धावणे तसेच दोन्ही रिले स्पर्धांमध्येही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अव्वल कामगिरी केली.
१७ वर्षे मुली या वयोगटात ८०० मीटर,३००० मीटर धावणे तसेच रिले स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.त्यामुळे मैदानी स्पर्धेत विद्यालयाने विविध गटांत आपले वर्चस्व सिद्ध केले.
याचबरोबर तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेतही बहिर्जी विद्यालयाच्या संघांनी दमदार कामगिरी केली.१४ वर्षे वयोगटातील मुले व मुलींचे दोन्ही संघ विजेते ठरले.तसेच १७ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या संघांनीही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जी.शेळके यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा विभाग प्रमुख व्ही.आर.वायचाळ,डी.एन.पाईकराव, जी.बी.नरवाडे,सुरज शिंदे तसेच हॉलीबॉल मार्गदर्शक नवीन शेळके,कुणाल बोबडे व पुजा चिलवंत यांचेही कौतुक करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सातत्यपुर्ण सरावाला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यालयाचे प्रोत्साहन लाभल्याने हे यश मिळाले आहे.जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व विजयी खेळाडुंना विद्यालयाच्या वतीने पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.मैदानी व हॉलीबॉल स्पर्धेतील या उल्लेखनीय कामगिरीमुळे हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.














Add Comment