जनसामान्यांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा
वसमत /तालुका प्रतिनिधी
वसमत विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार राजूभैया नवघरे यांच्या पुढाकाराने दि.२२ एप्रिल रोजी वसमत येथील शासकीय विश्रामगृह येथे भव्य ‘जनता दरबार’पार पडला.या कार्यक्रमाला मतदारसंघातील मायबाप जनतेने आणि विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती.
आमदार नवघरे यांनी सकाळपासूनच उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि अडचणी जाणून घेतल्या.यामध्ये प्रामुख्याने रस्ते,वीज,पाणीपुरवठा,महसूल विभागातील प्रलंबित कामे,कृषी आणि आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता. प्रत्येक तक्रार शांतपणे ऐकून घेत,त्यांनी उपस्थित असलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे कडक निर्देश दिले.
प्रशासनाची मोठी उपस्थिती
या जनता दरबारामध्ये तहसील कार्यालय,पंचायत समिती, महावितरण,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनासह सर्वच महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.अनेक तांत्रिक अडचणी आमदार नवघरे यांनी समोरासमोर बसून सोडवल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आमदार राजूभैया नवघरे यांचे प्रतिपादन
यावेळी बोलताना आमदार राजूभैया नवघरे म्हणाले की,”जनता हीच माझी मालक आहे.मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न सुटावेत आणि त्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत,हाच या जनता दरबाराचा मुख्य उद्देश आहे.लोकांच्या समस्यांची सोडवणूक करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
या जनता दरबारामुळे प्रशासकीय कामात गतिमानता दिसून आली असून,आपल्या समस्या थेट आमदारांसमोर मांडता आल्याने वसमत विधानसभा मतदारसंघातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.














Add Comment