NEET पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा २३ जुलै रोजी वसमत बंदचा इशारा
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत,
देशभर गाजत असलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा निषेध तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असुन,त्यास प्रतिसाद म्हणुन वसमत शहरातही बंद पाळण्यात येणार असल्याची पुर्वसुचना उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत,मार्केट कमिटी,व्यापारी महासंघ,पोलीस स्टेशन वसमत शहर यांना देण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा समन्वयक तथा वसमत तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत रंगनाथ स्वामी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी आंदोलनातुन करण्यात येत आहे.
निवेदनानुसार,विद्यार्थ्यांनी शांततापुर्ण आंदोलन करत असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या कथित लाठीचार्जचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.या घटनेमुळे देशभरात तसेच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असुन विद्यार्थ्यांना न्याय मिळावा,या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार राज्यव्यापी महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वसमत तालुका शाखेच्या वतीने दि.२३ जुलै रोजी वसमत शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान,हा बंद पुर्णपणे शांततापुर्ण व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.वसमत शहरातील व्यापारी,व्यावसायिक तसेच नागरिकांनी या बंदला सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करावा,अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर लक्ष्मीकांत स्वामी,शिलरत्न खंदारे,मुकुंद करवंदे राहुल करवंदे,अभिजीत आर्वीकर,राजरत्न गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.














Add Comment