वसमतमध्ये पहाटे घरात घुसून मुलीचे अपहरण,धाडसी चोरी,रोकड व सोनसाखळी लंपास.बंदुकीचा धाक दाखवुन कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप,चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस प्रशासनाने या गंभीर गुन्ह्याची सत्यता पडताळत आरोपिंचा शोध घेऊन योग्य चौकशी करावी नागरिकांची मागणी
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
वसमत शहरातील बुधवार पेठ परिसरात पहाटेच्या सुमारास घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण करून रोकड व सोन्याची साखळी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.यावेळी आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच फिर्यादीच्या मुलीला जबरदस्तीने उचलुन नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार दि.२८ ऑगस्ट रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान वसमत शहरातील बुधवार पेठ परिसरात ही घटना घडली.फिर्यादी दिपक सदाशिव कदम (वय ४१ वर्षे,व्यवसाय पेंटर,रा.बुधवारेपेठ,वसमत) यांच्या राहत्या घरात चार अनोळखी आरोपींनी संगनमत करून प्रवेश केल्याचे तक्रारीत नमुद आहे.
घरात प्रवेश केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस मारहाण केली.त्यानंतर घरातील ९ हजार २२५ रुपये रोख रक्कम तसेच फिर्यादीच्या गळ्यातील सव्वापाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी काढुन घेतल्याचे पोलिस नोंदीत नमुद करण्यात आले आहे.
याशिवाय आरोपींनी फिर्यादीचे हातपाय बांधुन बंदुकीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.त्यानंतर फिर्यादीच्या मुलीला जबरदस्तीने उचलुन नेऊन तिचे अपहरण केल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असुन,पहाटेच्या वेळी घरात घुसून अशा प्रकारे धाडसी गुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन भारतीय न्याय संहितेतील कलमां नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा तपास वसमत पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.
दरम्यान,पोलीस प्रशासनाच्या प्राप्त माहितीनुसार आरोपींची संख्या चार असुन ते अनोळखी पुरुष व्यक्ती असल्याचे नमुद आहे.गुन्ह्यातील आरोपी अद्याप अटक झाले नसुन,प्रकरणाचा तपास सुरू आहे.पोलिसांकडुन आरोपींचा शोध घेण्याबरोबरच घटनेमागील नेमके कारण,आरोपींची ओळख आणि अपहरण झालेल्या मुली बाबत पुढील तपास केला जात आहे.
या गंभीर प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा,अशी अपेक्षा नागरिकांकडुन व्यक्त होत आहे.














Add Comment