वसमत / तालुका प्रतिनिधी
दि. २७ एप्रिल रोजी वसमत येथे मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ ब्रिगेडतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित अवमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध यावेळी नोंदवण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी “शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडे दिला”असे विधान केल्याचा आरोप आहे. हे विधान असत्य,दिशाभूल करणारे व इतिहासात नोंद नसलेले असून शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे असल्याचे जिजाऊ ब्रिगेडने स्पष्ट केले.तसेच,संबंधित व्यक्तीने यापूर्वीही संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांसारख्या संतपरंपरेबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(A), २९५(A), ५०५(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्रात त्यांच्या कार्यक्रमांवर तात्काळ बंदी घालावी आणि भविष्यात अशा वक्तव्यांवर निर्बंध आणावेत,अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
“सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील असून तातडीने कारवाई न झाल्यास जिजाऊ ब्रिगेडतर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,”असा इशारा देखील देण्यात आला.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेऊन शिवप्रेमींच्या भावना समजून शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी,असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर वसमत तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.














Add Comment