लीजवर घेतलेल्या पार्किंगच्या वादग्रस्त जागेत श्री गणेश मुर्तीची स्थापना करून धर्माचा आधार घेतल्याचा आरोप
श्री गणेशमुर्तीची स्थापना परवानगी व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर,श्री गणेशमुर्तीची पाहणी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी,पोलीस निरीक्षकांकडे समाजसेवक सम्राट गायकवाड यांची लेखी तक्रार
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
वसमत शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील शंकरराव चव्हाण व्यापारी संकुलणाच्या नगरपरिषद वसमतने लीजवर दिलेल्या पार्किंगच्या वादग्रस्त जागेत कोणतीही सुरक्षा व्यवस्थेशिवाय तसेच शासकीय परवानगीशिवाय श्री गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आल्याचा आरोप करीत संबंधित प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात दि.१९ सप्टेंबर रोजी वसमत शहर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.तक्रारीनुसार,शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शंकराव चव्हाण शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या लीजवर दिलेल्या पार्किंगच्या वादग्रस्त जागेवर लोखंडी टिनचे पत्राचे शेड उभारलेले आहे.या ठिकाणी कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय श्री गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आली असुन, मुर्तीच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याचा मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.
धार्मिक भावनांचा आधार घेऊन अतिक्रमण कायम ठेवण्याचा आरोप
संबंधित ठिकाणी श्री गणेशमुर्तीची स्थापना करून धार्मिक भावनांचा आधार घेत अतिक्रमण कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.या प्रकरणाची धर्मादाय आयुक्त कार्यालय तसेच पोलीस विभागाकडुन दखल घेतली गेली आहे का,असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.श्री गणेशमुर्तीची स्थापना करताना आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत का,तसेच मंडप व परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत का,याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.तक्रारीत संबंधित ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची वर्दळ वाढण्याची शक्यता लक्षात घेता,सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे तक्रारदाराने नमुद केले आहे.याशिवाय,अतिक्रमणाच्या जागेवर श्री गणेशमुर्तीची स्थापना कशी करण्यात आली,असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून श्री गणेशमुर्तीच्या स्थापनेसंदर्भातील परवानग्या तपासाव्यात,अतिक्रमणाबाबत चौकशी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी समाजसेवक सम्राट गायकवाड यांनी लेखी तक्रार वसमत शहर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
दरम्यान,या तक्रारीवर पोलीस प्रशासनाकडुन कोणती भुमिका घेतली जाते,संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली जाते का आणि परवानग्यांबाबत काय निष्पन्न होते,याकडे वसमत शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये,यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.














Add Comment