वसमत शहरात सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास,दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवु नये -पो.नी.सुधीर वाघ
वसमत शहरातील पंचशील नगर परिसरात सेवानिवृत्त शिक्षकाच्या हातातील सोन्याची अंगठी दोन अज्ञात व्यक्तींनी चलाखीने काढुन घेतल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार,गुंडीबा नागोराव धोरात (वय ६६,व्यवसाय-सेवानिवृत्त शिक्षक,रा.पंचशील नगर,वसमत) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.त्यांच्या तक्रारीनुसार,दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वसमत-औंढा रोडवरील राजश्री शाहु अपंग विद्यालयालगतच्या रस्त्यावर ही घटना घडली.
दोन अज्ञात व्यक्तींनी संगनमत करून आपण पोलीस असल्याची बतावणी केली.त्यानंतर फिर्यादीच्या हातातील सुमारे सहा ग्रॅम वजनाची,अंदाजे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हातचलाखीने काढुन घेत फसवणुक केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दि. २१ ऑगस्ट रोजी रात्री वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या पोलिसांकडुन प्रकरणाचा तपास सुरू असुन अज्ञात आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिस प्रशासनाकडुन सांगण्यात आले.
दरम्यान,नागरिकांनी अनोळखी व्यक्ती पोलीस असल्याचे सांगुन चौकशी किंवा तपासणी करत असल्यास त्यांची ओळख व अधिकृतता खात्रीशीरपणे तपासावी,असे आवाहन वसमत शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधीर वाघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.














Add Comment