Editor Choice Education Social work

‘साहित्य म्हणजे मानवी भावना अन् समाजजीवनाचा खरा आरसा’ ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांचे प्रतिपादन

“साहित्य म्हणजे मानवी भावना अन् समाजजीवनाचा खरा आरसा”

ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांचे प्रतिपादन

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

दि.२० ऑगस्ट रोजी वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयात माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘सद्भावना सर्वप्रथम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यानंतर ‘साहित्य आणि समाज’ या विषयावर विशेष व्याख्यान घेण्यात आले.या व्याख्यानासाठी ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे (परभणी) प्रमुख व्याख्याते म्हणुन उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक ॲड.रामचंद्र बागल होते.

आपल्या अभ्यासपुर्ण आणि प्रभावी मांडणीत आसाराम लोमटे म्हणाले की,“साहित्य म्हणजे केवळ पुस्तके,कथा,कादंबरी किंवा कविता नसुन मानवी भावना व्यक्त करण्याचे एक प्रगल्भ माध्यम आहे. साहित्य हे मानवी भावना आणि समाजजीवनाचा खरा आरसा आहे.” लिपीचा शोध लागण्यापुर्वीही माणुस लोकसाहित्यातुन आपल्या भावना व्यक्त करीत होता.इ.स.१९७२ च्या भीषण दुष्काळाच्या आठवणी सांगताना त्यांनी त्या काळातील बिकट परिस्थितीचे चित्र उभे केले.प्रतिकुल परिस्थितीतही संस्कृतीची पाळेमुळे जपणाऱ्या माणसांनी समाजाला नवी दिशा दिली,असे त्यांनी नमुद केले.

साहित्य समाजाला केवळ आरसा दाखवत नाही,तर धर्म आणि समाजाला भानावर आणण्याचे,प्रश्न उपस्थित करण्याचे आणि गरज पडल्यास ललकारण्याचे कामही करते.काळाला दिलेल्या प्रतिसादातुन साहित्याची निर्मिती होते,असेही लोमटे यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की,समीक्षकीय शब्दांच्या गुंतागुंतीत न अडकता साहित्याचा ‘आशय’ म्हणजे लेखकाच्या अंतःकरणाची हाक,तर ‘अभिव्यक्ती’ म्हणजे विचार मांडण्याचे माध्यम होय. प्रत्येकाच्या घड्याळातील वेळ एकच असली,तरी प्रत्येकाच्या वाट्याला येणारी आव्हाने आणि प्रश्न वेगवेगळे असतात.लेखक ज्या काळात जगतो, त्या काळातील सामाजिक गुंते उकलण्याचे काम तो आपल्या लेखनातून करतो.त्यामुळे साहित्य हे समाजजीवनाचा खऱ्या अर्थाने आरसा ठरते,असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.मा.मा.जाधव यांनी केले. अध्यक्षीय समारोप ॲड.रामचंद्र बागल यांनी केला.सुत्रसंचालन डॉ.शारदा कदम यांनी केले,तर आभार डॉ.उद्धव राऊत यांनी मानले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव आमदार पंडितराव देशमुख,संस्थेचे संचालक रामचंद्रजी बागल,प्राचार्य डॉ.मा.मा.जाधव,मुख्याध्यापक प्रविण शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘प्रज्ञा परिसंवाद समिती’चे प्रा.प्रदीप इंगोले,प्रा.शिवराज यलपलवाड यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,वसमत परिसरातील विविध क्षेत्रांतील पदाधिकारी,लेखक, विचारवंत,साहित्यिक,पत्रकार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement