शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग,प्रकल्प रद्द करण्याची मागणी – संदीप माटेगावकर
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक:गिरीष देशमुख,वसमत
नागपूर–गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा व त्यांच्या संसारावर घाला घालणारा प्रकल्प असल्याचा आरोप करत हा महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.या मागणीसाठी दि.२२ जुन रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे शक्तीपीठ संघर्ष समितीच्या वतीने तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बोलताना शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी सांगितले की,शक्तिपीठ महामार्ग हा कोणतीही लोकमागणी नसलेला आणि गरज नसलेला प्रकल्प आहे. शासनाने तो तात्काळ रद्द करावा,अन्यथा शेतकऱ्यांचा तीव्र उद्रेक राज्यभर दिसून येईल.
महामार्गामुळे विकासाच्या नावाखाली विनाश होणार असून पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होण्याची शक्यता आहे.हजारो झाडांची कत्तल,मातीचे प्रदूषण तसेच पुराचा धोका वाढण्याची भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत, “आम्ही जीव देऊ; पण वडिलोपार्जित जमिनी देणार नाही,”असा निर्धार व्यक्त केला. महिला शेतकरीदेखील मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनानंतर औंढा तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाचे आयोजन पंडित सूर्यतळ व निवृत्ती नरवाडे यांनी केले होते.यावेळी जवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ कुऱ्हे पाटील, पुष्पक देशमुख,विश्वनाथ सावंत,तानाजी भोसले,गोरख सावंत,बन्सी कदम,हनुमान आहेर,दीपक सोनवणे,लिंबाजी सावंत यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
“शेतकऱ्यांचे मत हवे असते; पण शेतकऱ्यांचा विचार करणारे नेते उरले नाहीत”
कुठलेही सरकार सत्तेत आले तरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही.शेतीमालाला हमीभाव देऊन बळीराजाला सक्षम करण्याऐवजी सरकार शक्तिपीठ महामार्गासारखे प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती मुनीर पटेल यांनी केला.














Add Comment