शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरकती दाखल करण्यासाठी शेतकरी आक्रमक
दिशा न्युज मराठी २४ ×७,
मुख्य संपादक: गिरीष देशमुख
हिंगोली जिल्ह्यातुन प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम असुन दि.२५ जुन रोजी वसमत व औंढा तालुक्यातील शेकडो शेतकरी हरकती घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय,वसमत येथे दाखल झाले.
यावेळी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी विकास माने यांना हरकतीचे निवेदन सादर करून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गास आपला ठाम विरोध असल्याचे लेखी स्वरूपात कळविले.
शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी सरकारने तात्काळ शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव रद्द करावा,अन्यथा शेतकरी लेकराबाळांसह रस्त्यावर उतरतील,असा इशारा दिला.”शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही,”अशी भुमिका त्यांनी व्यक्त केली.
तानाजी भोसले यांनीही प्रशासनावर टीका करत, शासनाने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहु नये,अन्यथा उद्रेक झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील,असा इशारा दिला.तसेच शेतकऱ्यांच्या बाजुने ठामपणे उभे राहुन जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया रोखण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहुन शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी ठोस भुमिका घ्यावी,अशी मागणी केली.अन्यथा लोकप्रतिनिधींच्या घरांवर मोर्चे काढण्यात येतील,असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
हरकती सादर करण्यासाठी बोरी सावंत,करंजाळा,गुंडा,शिरला, शेंदूरसेना,चोंडी,पिंपळगाव कुटे,हट्टा,आडगाव आदी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये नवनाथ पाटील,गोरख चव्हाण,पप्पु जाधव,विश्वनाथ सावंत आदींचा समावेश होता.
दरम्यान,हिंगोली शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने लवकरच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहितीही शेतकऱ्यांनी दिली.














Add Comment