राजुभैय्या नवघरे यांच्या उमेदवारी अर्जासाठी हिंगोली जिल्ह्यातुन शेकडो वाहनांचा ताफा परभणीकडे रवाना
मुख्य संपादक: गिरीष देशमुख
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दि.१९ जून रोजी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजुभैय्या नवघरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी परभणीकडे प्रस्थान केले.यावेळी त्यांच्या समर्थनार्थ हिंगोली व वसमत परिसरातुन शेकडो वाहनांचा ताफा परभणीकडे रवाना झाला.
सकाळपासुनच आमदार नवघरे यांच्या निवासस्थानी व संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वाहनांचा लांबच लांब ताफा परभणीकडे रवाना झाल्याने परिसरात निवडणुकीची रंगत वाढल्याचे चित्र दिसून आले.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही दोन्ही जिल्ह्यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित महत्त्वाची संस्था मानली जाते.त्यामुळे या निवडणुकीकडे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आमदार राजुभैय्या नवघरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर विविध राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान,वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष सचिन भोसले यांनीदेखील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या घडामोडींमुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील वातावरण चांगलेच तापले असुन आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Add Comment