Crime Editor Choice Hingoli dist

वसमत नगरपरिषदेच्या स.नं. १८० मधील भुखंड अतिक्रमण प्रकरण दडपण्याच्या हालचालींना वेग,प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात

वसमत नगरपरिषदेच्या स.नं. १८० मधील भुखंड अतिक्रमण प्रकरण दडपण्याच्या हालचालींना वेग,प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात 

अतिक्रमण प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही ?

मुख्य संपादक: गिरीश देशमुख

वसमत नगरपरिषदेच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आलेल्या सर्वे क्रमांक १८० या जागेबाबत निर्माण झालेला वाद अद्यापही कायम असुन,संबंधित जागेचे नामांतर होऊ नये तसेच कथित खोट्या कागदपत्रांच्या आधारे झालेली नोंदणी (रजिस्ट्री) रद्द करण्यात यावी,अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगरपरिषद वसमत यांच्याकडे,नगराध्यक्षा सौ.सुनीता बाहेती यांच्यासह काही नगरसेविकांनी केलेली आहे.

सदर प्रकरण मागील आठवडाभर शहरात चर्चेचा विषय ठरले होते.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे लेखी अर्ज दिला होता.त्यानंतर नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व शिक्क्यांचा वापर करून काही संशयास्पद कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप समोर आला. या कथित कागदपत्रांच्या आधारे संबंधित भुखंडाची नोंदणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र,प्रकरण उघडकीस येऊन दुसरा आठवडा सुरू झाला असतांना सुद्धा अद्याप वसमत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.या प्रकरणात शहरातील काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता असल्यामुळे सदरील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालु आहे याबाबत चर्चा शहरात रंगत आहे.

प्राप्त माहितीनुसार,प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी काही प्रभावशाली व्यक्तींच्या मध्यस्थीने बैठका सुरू असल्याची चर्चा आहे.त्यामुळे या गंभीर आरोपांची सखोल चौकशी होणार की प्रकरण थंडबस्त्यात जाणार,याकडे वसमतकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,संबंधित आरोपांबाबत अधिकृत चौकशी अहवाल अथवा पोलीस तपासाची माहिती अद्याप समोर आलेली नसल्याने वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे “आओ चोरों खावो चारा आधा तुम्हारा आधा हमारा” अशी परिस्थिती निर्माण होणार की दोषींवर कारवाई होणार,याबाबत शहरातील सर्वसामान्य नागरिकांची  उत्सुकता वाढली आहे.

Featured

Advertisement

Advertisement