दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक गिरीष देशमुख,वसमत
वसमत शहरातील परभणी रोडलगत असलेल्या जयनगर परिसरात शुक्रवारी दि. ७ ऑगस्ट दुपारी १२ ते ०१ च्या सुमारास भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक उल्हास शंकरराव राठोड यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले असुन,घरातील दोन लोखंडी कपाटाचे लॉक तोडुन ऐवज लंपास केल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असुन,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,उल्हास राठोड हे दि.०७ ऑगस्ट रोज शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पत्नीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत संशयित चोरट्यांनी त्यांच्या घरावर पाळत ठेवुन घरफोडी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार,तीन संशयित युवक बिना नंबरप्लेट असलेल्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून परिसरात आले होते.तिघांनीही तोंडाला मास्क लावले होते.परिसरातील काही महिलांकडे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध नसलेल्या व्यक्तींचे पत्ते विचारले.त्यानंतर संशयितांनी परिसरात काही वेळ राउंड मारून घरांची पाहणी केल्याचे सांगण्यात येत आहे.
राठोड यांच्या घराला कुलूप असल्याचे लक्षात आल्यानंतर संशयितांनी घरात प्रवेश केला.घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडुन त्यातील ऐवज लंपास करून चोरटे पसार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.चोरीला गेलेल्या ऐवजाची नेमकी किंमत वृत्त लिहिपर्यंत स्पष्ट झालेली नव्हती.
घटनेची माहिती मिळताच वसमत शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.तसेच हिंगोली येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातुन फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असुन,त्यांनी घटनास्थळी ठसे घेण्याचे काम सुरू केले आहे.
दरम्यान,वसमत शहर पोलिसांकडुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असुन,संशयित चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडुन विविध दिशेने तपास सुरू आहे.
महिन्यातील दुसरी भरदिवसा घरफोडी
वसमत शहरात मागील काही दिवसांपासुन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी चोरी करण्याऐवजी चोरट्यांकडुन भरदिवसा बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वसमत शहरातील ही घटना महिन्यातील दुसरी भरदिवसा झालेली घरफोडी असल्याने पोलिसांनी दिवसाच्या वेळी गस्त वाढवावी,अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.
वृत्त लिहिपर्यंत पोलिसांना फिर्यादीचा जबाब मिळालेला नव्हता.त्यामुळे अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता.जबाब नोंदवल्यानंतर चोरीला गेलेल्या ऐवजाची नेमकी माहिती आणि गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.














Add Comment