Editor Choice Hingoli dist Maharashtra

इंजनगाव येथील त्या वादग्रस्त जागेवर मध्यरात्री विना परवानगी महामाणवाचा पुतळा बसवल्याने गावात तणाव.

इंजनगावातील त्या वादग्रस्त जागेवर मध्यरात्री विना परवानगी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला,गावात तणावपुर्ण शांतता

पोलीस- महसुल प्रशासनाचा मोठा बंदोबस्त,तोडगा काढण्यासाठी प्रशासनाची संबंधित समाजासोबत चर्चा.

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख 

 

वसमत तालुक्यातील इंजनगाव (पश्चिम) येथील वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन,शनिवारी मध्यरात्री सरकारी जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आल्याने गावात तणावपुर्ण शांतता निर्माण झाली आहे.परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस व महसुल प्रशासनाने गावात मोठा बंदोबस्त तैनात केला असुन,इंजनगावला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी मध्यरात्री अचानक संबंधित ठिकाणी लोखंडी अँगल जमिनीत सिमेंटने बसवुन त्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला.विशेष म्हणजे,या जागेच्या जवळच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याची तात्पुरती पोलीस चौकी आहे.मध्यरात्री अचानक ही प्रक्रिया सुरू झाल्याने चौकीवर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे,वसमत शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधीर वाघ,वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरडोडे,तहसीलदार सारंग चव्हाण,कुरुंदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरी,हट्टा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप बोरकर यांच्यासह पोलीस व महसुल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान,इंजनगावातील या जागेचा वाद यापुर्वीही चर्चेत आला होता.काही दिवसांपुर्वी याच वादग्रस्त जागेवर मातंग समाजाच्या वतीने झेंडा उभारून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली होती.त्यावेळीही प्रशासनाने मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.त्यामुळे आता मध्यरात्री पुन्हा पुतळा बसविण्यात आल्याने या वादाला नव्याने तोंड फुटले आहे.

सध्या गावात तणावपुर्ण शांतता असुन,कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस प्रशासनाकडुन कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.महसुल व पोलीस प्रशासन संबंधित समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून परिस्थिती शांततेने हाताळण्याचा आणि कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे.

प्रशासनाच्या भुमिके कडे तसेच या वादग्रस्त जागेबाबत पुढील निर्णयाकडे इंजनगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement