वसमत / तालुका प्रतिनिधी
दि.१६ मार्च रोजी चारठाणा ता.जिंतुर परिसरात दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हेशाखा परभणीच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल तथा वसमतचे भूमिपुत्र निलेश भुजबळ यांच्यावर आरोपीने चाकूने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना दाखवलेल्या धाडस,शौर्य आणि निष्ठेचा गौरव म्हणून त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ए.एस.आय.) पदावर पदोन्नती देण्यात आली.
निलेश भुजबळ यांची पोलीस खात्यातील तब्बल २४ वर्षांची सेवा असून,त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आजवर एकूण ७४५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.कर्तव्यनिष्ठा आणि धाडसी कार्यपद्धतीमुळे ते पोलीस दलात विशेष ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.
विशेष बाब म्हणजे,जखमी अवस्थेमुळे ते प्रत्यक्ष हजर राहू शकत नसल्याने दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्वतःत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या खांद्यावर ए.एस.आय.पदाचे स्टार लावून त्यांचा सन्मान केला.या भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंगाने पोलीस दलात कर्तव्यनिष्ठा,शौर्य आणि समर्पणाचा गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
कर्तव्य बजावताना गंभीर जखमी होऊनही धैर्य न हरवणाऱ्या निलेश भुजबळ यांच्या कार्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली दखल ही संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरत असून,या घटनेमुळे पोलीस विभागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी सुरज गुंजाळ.अतिरिक्त पोलीस अधीक्षक परभणी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील,इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह भुजबळ कुटुंबीय उपस्थित होते.














Add Comment