वसमत-मोहगाव-फत्तेपुर पांदण रस्त्याच्या निकृष्ट कामावर शेतकऱ्यांचा संताप.काम बंद
वसमत / तालुका प्रतिनिधी
दि. १४ मे रोजी वसमत तालुक्यातील मोहगाव तर्फे फत्तेपुर येथे ‘मातोश्री पांदण रस्ता’योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काम बंद पाडले.संबंधित गुत्तेदार व इंजिनिअर यांच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,रस्त्याच्या खोदकामातून निघणारी काळी माती थेट रस्त्यावरच टाकली जात आहे.त्यामुळे भविष्यात हा रस्ता चिखलमय होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने अखेर मोहगाव व फत्तेपुर शिवारातील शेतकरी एकत्र येत आंदोलनाच्या भूमिकेत गेले.
रात्रीच्या अंधारात काम सुरू असल्याचा आरोप
संबंधित गुत्तेदार व इंजिनिअर हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकरी सायंकाळी घरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी काम केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.निकृष्ट दर्जाचे काम लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून रात्री काम उरकले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
रस्त्यावर टाकलेली काळी माती तात्काळ हटवावी.
रस्त्याचे काम दर्जेदार व नियमानुसार पूर्ण करावे.
कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी.
“आमच्या शेतातून रस्ता घ्या,पण तो टिकाऊ आणि चांगल्या दर्जाचा करा,”अशी भूमिका दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी घेतली आहे.
घटनास्थळी मोठी उपस्थिती
आज मोहगाव व फत्तेपूर शिवारातील मोठ्या संख्येने शेतकरी घटनास्थळी जमा झाले होते.त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काम बंद करण्यात आले.
यावेळी फत्तेपूर शिवारातील बेले,काशिनाथ नाईक,काशिबा नायक सर,केशव नाईकवाडे,मल्लिकार्जुन,उमाजी,हनुमंत,अमरबिन चाऊस,शेवंतराव नाईकवाडे,सिद्धार्थ मोरे,विठ्ठल मोरे,लक्ष्मण मोरे,सूर्यकांत टाक,शेख इस्माईल,शेख आयुब,अशोक ढोणे तसेच मोहगाव शिवारातील विकास तांबोळी,संभाजी ढोणे,दशरथ ढोणे,नरेश टाक,भाऊराव जाधव,बालाजी जांभळे,मारुती माने,साहेबराव तांबोळी,पंडितराव ढोणे आदी शेतकरी उपस्थित होते.
आता या प्रकरणात प्रशासन कोणती कारवाई करते,याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
(छाया : नागेश चव्हाण)
वसमत-मोहगाव-फत्तेपुर पांदण रस्त्याच्या निकृष्ट कामावर शेतकऱ्यांचा संताप.काम बंद













Add Comment