कोरोना जाऊन आता पाच वर्षे पेक्षा जास्त काळ झाला आहे.या महामारीने जगावर मोठ संकट उभे केले,त्याच प्रमाणे अनेक नवीन गोष्टींना जन्माला घातले,अनेक नव्या संधी निर्माण झाल्या.सर्वच क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात बरे वाईट अनुभव आले.
विशेष करुन शिक्षण क्षेत्रात मोठे बदल अनुभवास आले.या काळात सुरुवातीला शिक्षण क्षेत्र पुर्ण बंद करण्यात आले होते. पुढे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले.त्यावेळी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मोठे कौतुक झाले. पण या ऑनलाईन शिक्षणामुळे वर्गात न जाता घरी बसुन परीक्षा पास होता येते आणि पदवी प्राप्त करता येते हा समज दृढ झाला.आणि आज महाविद्यालयात न जाता घरी बसुन पदवी मिळवता येते,हा रोग इतका गंभीर झाला आहे की,विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येणे बंद केले आहे.विद्यार्थ्यांची वर्गातील ऊपस्थिती या प्रश्नाने सर्व शैक्षणिक वातावरण गंभीर बनले आहे.दहावी पर्यंत आजही विद्यार्थी मोठ्या संख्येने वर्गात ऊपस्थित असतात.दहावी नंतर खाजगी क्लासेस मुळे वर्गातील ऊपस्थिती कमी होण्याचे प्रमाण पुढे वाढतच आहे.
बारावी नंतर उच्च शिक्षणात वर्गातील उपस्थितीचे प्रमाण प्रचंड खालावले आहे.
फक्त प्रवेश घेणे व परीक्षा देणे या व्यतिरिक्त महाविद्यालयात ऊपस्थित राहावे लागते व वर्गात आणि प्रयोगशाळेत ऊपस्थित राहुन ज्ञान प्राप्त करावे लागते हेच आजचे विद्यार्थी विसरले आहेत असे दिसते.ही समस्या गंभीर रुप धारण करत असताना व भविष्यात यातील धोके स्पष्ट दिसत असताना अनेक शिक्षण तज्ञ,संस्था,विद्यापीठे,शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार, प्राचार्य,शिक्षक,प्राध्यापक असे अनेक जण विविध वर्तमानपत्रांतून,कार्यक्रमातुन , भाषणातुन यावर चर्चा करताना दिसत आहेत.
विद्यार्थ्यांची वर्गातील अल्प ऊपस्थितीची कारणे पाहिली असता विद्यार्थी,पालक,शिक्षक, संस्था,शासन,प्रशासन हे शैक्षणिक व्यवस्थेतील मुख्य घटक एकमेकांकडे दोष पुर्ण अंगुलीनिर्देश करताना दिसतात.व्यावसायिक व खाजगी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली आहे पण आज पारंपरिक कला,विज्ञान व वाणिज्य शाखेच्या महाविद्यालयांना या समस्येचा मोठा सामना करावा लागतो आहे.बारावी परीक्षे नंतर व्यावसायिक व खाजगी संस्थेत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, ज्यांची संख्या खूप मोठी आहे,असे सर्व विद्यार्थी या पारंपरिक महाविद्यालयात प्रवेश घेतात. आज कला विज्ञान अथवा वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त करुन लगेच काही काम सुरु करता येईल अथवा कुठे नौकरी मिळेल अशी परिस्थिती राहिलेली नाही.मागील दहा बारा वर्षाचा विचार केला तरी पुढे पदव्युत्तर पदवी पुर्ण करुन सुद्धा या मध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही.यामुळे विद्यार्थी व पालक दोघांनीही या शिक्षणाला दुय्यम स्थान दिले असल्याचे दिसते.आज महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.शासनाचा उच्च शिक्षणा वरील खर्च जवळपास बारा हजार कोटी रुपये आहे.एवढा मोठा खर्च करुनही शासनाचा फारसा फायदा होत नाही असे शासकीय पातळीवर बोलल्या जाते.त्यामुळे शासन व प्रशासन यांच्यात या विषयावर उदासीनता दिसून येते.आम्ही खुप चांगल्या इमारती,वर्ग खोल्या,प्रयोगशाळा,कर्मचारी व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत असे संस्थाचालक प्रतिनिधींचे म्हणणे आहे.विद्यार्थ्यांना अध्यापन व मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सतत कार्यरत असुन नियमितपणे तासिका,प्रयोगशाळा, क्रीडांगण,ग्रंथालय येथे सदैव उपलब्ध असल्याचे शिक्षक,प्राध्यापक,प्राचार्य व कर्मचारी यांचे म्हणणे आहे.एकंदरीत विद्यार्थी,पालक,शिक्षक,शासन व संस्थाचालक सर्व आपापल्या परीने योग्य वाटत असले तरी कुठे तरी शैक्षणिक व्यवस्थेत बदल व सुधारणा आवश्यक असल्याची जाणीव सर्वांना झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या अल्प ऊपस्थितीच्या कारणांचा शोध घेतला असता आज विद्यार्थी व पालक महाविद्यालयीन शिक्षणा पेक्षा ऊदर निर्वाहाच्या पर्यायांना प्राथमिकता देत असल्याचे व त्या बदल्यात वर्गातील उपस्थिती कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.वेळोवेळी शिक्षण पध्दतीत बदल न केल्याने आलेला तोच तो पणा,रोजगार निर्मिती क्षमतेत झालेली मोठी घट,कौशल्य आधारित अभ्यासक्रमांची कमतरता,पी एच डी सारखी अत्युच्च पदवी प्राप्त करुनही हुकलेली संधी,उच्च शिक्षणासाठी वाढलेला खर्च,मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीची वाढलेली लोकप्रियता व सहज प्राप्त होणारी समतुल्य पदवी,उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती योजनांच्या माहिती व अंमलबजावणीचा अभाव,सतत सुरु असलेली व वेगवेगळे प्रयोग सुरु असलेली परीक्षा पध्दती, महाविद्यालयांची वाढलेली संख्या,विनाअनुदानित धोरण, शिस्तीचा अभाव,प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता,मोबाईलचा वाढलेला अतिरेकी वापर,वेळेवर बदलणारी शासकीय धोरणे,केंद्र,राज्य व शैक्षणिक संस्था यांच्या मधील विस्कळीत संवाद,घाईत घेतले जाणारे निर्णय अशा अनेक कारणांचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होत आहे.यातुनच कधी काळी गजबजलेली महाविद्यालये ओस पडत चालली आहेत.वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बोटावर मोजण्या इतपत येऊन ठेपली आहे.देशाचे भविष्य घडवणारे शिक्षण क्षेत्र संक्रमणाच्या अवस्थेत मार्गक्रमण करीत आहे.
यावर उपाय म्हणून अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.शासकीय पातळीवर ३५ वर्षानंतर शैक्षणिक धोरण बदलले असुन नवीन शैक्षणिक धोरणाचा पुरस्कार केला आहे. भविष्यकालीन संधी,रोजगार, अभ्यासक्रमांची पुनर्रचना, कौशल्या धारित अभ्यासक्रम इत्यादीचा नवीन शैक्षणिक धोरणात अंतर्भाव केला आहे. विद्यापीठ आपल्या स्तरावर नवीन अभ्यासक्रमांची रचना व ते लागु करणे,प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण,विज्ञान,तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर,प्रशासनातील सुसुत्रता, महाविद्यालयांशी संवाद,परीक्षांचे वेळेवर निकाल जाहीर करणे,कालबध्द कार्यक्रमांची आखणी इत्यादी बाबतीत आमुलाग्र बदल अनुभवास येत आहेत.संस्था व महाविद्यालय यांनी संयुक्तपणे वर उल्लेख केलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी योग्य रितीने करण्याची जबाबदारी घेतलेली आहे व त्याप्रमाणे आपले शिक्षक व कर्मचारी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या वर्गातील अनुपस्थितीने आपल्या नौकरी वर गदा येऊ शकते,नवीन पद निर्मिती सोडा,आहे तीच पदे कायम राहतील का या प्रश्नाने प्राध्यापक वर्ग सुध्दा हैराण झाला आहे.विद्यार्थ्यां मधील हरवलेला आत्मविश्वास परत निर्माण करण्यासाठी प्राचार्य व प्राध्यापक यांनी गावोगावी भेटी देत,विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधत,वर्गातील ऊपस्थितीचे फायदे व अनुपस्थिती चे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थी,पालक व नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे.अनेक महाविद्यालया तर्फे रोजगार क्षम अभ्यासक्रम सुरु केले आहेत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक,अडी अडचणी सोडविण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली आहे.संवाद,मेळावे,चर्चा सत्राचे आयोजन होत आहे.अशा प्रकारे सर्वच पातळ्यांवर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.निश्चितच येणाऱ्या नवीन पिढीसाठी व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, शिक्षण क्षेत्रातील सर्व घटक एकजुटीने काम करु लागले आहेत.भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसुन येतील अशी अपेक्षा आहे.
प्रा डॉ अनिल मुगुटकर
बहिर्जी स्मारक महाविद्यालय
वसमत
मो.नं. 9822476611














Add Comment