Editor Choice Social work Vasmat city

वसमत रेल्वे स्टेशन परिसरात पोलिस चौकीची मागणी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

दोन वर्षांपासून नागरिक व पत्रकार मोईन कादरी यांची सातत्यपूर्ण मागणी

प्रतिनिधी-वसमत(जि.हिंगोली) दि.१३-एप्रिल-२०२६
वसमत शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
शहराबाहेरील या रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळी, विशेषतःरात्री नऊनंतर,लुटमारीसारख्या घटना घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांना असुरक्षित वाटत असल्याचे चित्र आहे.परिणामी,अपरात्री रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना गावात जाण्यास धाडस होत नसल्याची स्थिती आहे.
सध्या पोलिसांकडून गस्त घालण्यात येत असली तरी गस्तीची वाहने एका ठिकाणी जास्त वेळ थांबू शकत नसल्याने या समस्येवर प्रभावी तोडगा निघत नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान,या परिसरात जागृत शिवशिवेश्वर महादेव मंदिर,ईदगाह,चिमनशाहा वली दर्गा,शीख बांधवांचे ऐतिहासिक गुरुद्वारा दमदमा साहेब,तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व बौद्ध विहार असल्यामुळे येथे नागरिक व भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.विविध धर्मीय स्थळांमुळे हा परिसर सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या पार्श्वभूमीवर,रेल्वे स्टेशन चौकात कायमस्वरूपी पोलिस चौकी स्थापन करून गुन्हेगारीवर आळा घालावा व प्रवासी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी,अशी मागणी स्थानिक नागरिक व पत्रकार मोईन कादरी यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने केली आहे.
तसेच,जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी,अशी विनंती नागरिकांकडून करण्यात येत आहे.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत महत्त्वाची असून प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Featured

Advertisement

Advertisement