Health & Fitness • Hingoli dist • Vasmat city

वसमत शहरातील मुख्य मार्केटमध्ये साठवलेले १ लाख ४७ हजार ७८५ रुपयांचे फटाके जप्त.

वसमत शहरातील मुख्य मार्केटमध्ये साठवलेले १ लाख ४७ हजार ७८५ रुपयांचे फटाके जप्त. 

परवानगिवीना व असुरक्षित पद्धतीने फटाक्यांचा साठा केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल 

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत 

हिंगोली शहरातील भरवस्तीत फटाक्यांच्या गोदामाला आग लागुन जीवितहानी झाल्याच्या पार्श्वभुमीवर वसमत महसुल प्रशासन आणि वसमत शहर पोलिसांनी फटाक्यांच्या साठवणुकीबाबत कारवाईला सुरुवात केली आहे.या अंतर्गत शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट परिसरातील नगर परिषद गाळ्यांमध्ये परवानगीविना तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करता फटाक्यांचा साठा केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान विविध प्रकारचे तब्बल १ लाख ४७ हजार ७८५ रुपये किमतीचे फटाके जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.०५ वा.सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट,नगर परिषद गाळा परिसर,वसमत येथे ही कारवाई करण्यात आली. संबंधित ठिकाणी विविध प्रकारचे फटाके परवानगीविना व धोकादायक पद्धतीने साठवुन ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हा मुद्देमाल ताब्यात घेतला.

फटाक्यांची साठवणुक करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फटाके हे ज्वलनशील व स्फोटक स्वरूपाचे असल्याने त्यांचा साठा करताना सुरक्षित जागा,अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच संबंधित विभागाची आवश्यक परवानगी असणे गरजेचे आहे.मात्र,संबंधित ठिकाणी नियमांचे पालन झाले नसल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.

या प्रकरणी राजु सिताराम क्षीरसागर,व्यवसाय मंडळ अधिकारी,तहसील कार्यालय वसमत यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध स्फोटक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.७ ऑक्टोबर रोजी रात्री या प्रकरणाची वसमत शहर पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आली

दरम्यान,या कारवाईत पोलिसांनी विविध प्रकारचे फटाके असा एकुण १,४७,७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.प्रकरणाचा पुढील तपास वसमत शहर पोलिसांकडुन सुरू असुन,पोलिस नोंदीनुसार गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दि.५ सप्टेंबर रोजी हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या गोदामाला आग लागुन मोठी दुर्घटना घडली होती. भरवस्तीत घडलेल्या या घटनेत जीवितहानी तसेच अनेकजण जखमी झाले होते. या घटनेनंतर फटाक्यांची साठवणुक आणि विक्री करताना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.त्याच पार्श्वभुमीवर वसमत प्रशासन आणि पोलिसांनी फटाक्यांच्या साठ्याची तपासणी सुरू केली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभुमीवर शहरात फटाक्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे परवानगीविना फटाक्यांचा साठा करणारे तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करून विक्री करणाऱ्यांवर प्रशासन व पोलिसांकडुन कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फटाक्यांची साठवणुक व विक्री करताना संबंधित शासकीय नियम आणि अग्निसुरक्षा उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात येत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement