Agriculture News Good working Hingoli dist

तुम्ही आमच्या पिढ्यान् पिढ्या उध्वस्त करायच्या आणि त्याला आम्ही विकास म्हणायचं का ?

तुम्ही आमच्या पिढ्यान् पिढ्या उध्वस्त करायच्या आणि त्याला आम्ही विकास म्हणायचं का ?

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक- गिरीष देशमुख 

माजी खासदार राजु शेट्टी यांचा घणाघाती सवाल,शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

“मुठभर भांडवलदारांना खुश करण्यासाठी प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग हा केवळ महामार्ग नाही,तर शेतकऱ्यांच्या मरणाचा हायवे आहे.तुम्हाला जायचे असेल तर हवेतुन जा,समुद्रावर पुल बांधा,पण आमच्या शेतातुन आणि घरातुन जाणार असाल,तर आधी आमच्या छातीवरून जावे लागेल.आम्हाला आठ पदरी रस्ते नकोत,तर दोन वेळच्या भाकरीसाठी आमची हक्काची जमीन हवी आहे. आमच्या सुपीक जमिनींवर बुलडोझर चालवायचा,पिढ्यान् पिढ्यांच्या वाड्या-वस्त्या उद्ध्वस्त करायच्या आणि त्याला विकास म्हणायचे का?”असा घणाघाती सवाल माजी खासदार तथा शेतकरी नेते राजु शेट्टी यांनी राज्य सरकारला केला.

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा,हळदीच्या दरातील लुट थांबवावी आणि उसाला योग्य व उच्चांकी दर मिळावा,या प्रमुख मागण्यांसाठी मौजे हट्टा येथील सिद्धेश्वर मंदिरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित एल्गार परिषद सामुहिक निर्धाराने पार पडली.यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना राजु शेट्टी बोलत होते.

शक्तीपीठ महामार्गामुळे शेती,शेतकरी,ग्रामजीवन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच महामार्गाविरोधातील लढा अधिक व्यापक आणि संघटित करण्याचा निर्धार उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

राजु शेट्टी पुढे म्हणाले की,“सुपीक जमिनी कापुन,घरे उद्ध्वस्त करून आणि पिढ्यान् पिढ्यांची वसाहत नष्ट करून कोणता विकास साधणार आहात?हा महामार्ग विकासाचा नव्हे,तर शेतकऱ्यांच्या मरणाचा राजमार्ग आहे.आम्हाला रस्ते नकोत,आम्हाला आमची शेती हवी आहे.आमच्या जमिनीवर बुलडोझर चालवण्यापुर्वी आमच्या छातीवरून जावे लागेल,हे सरकारने लक्षात ठेवावे.”

हळदीच्या दरावरही संताप

“हिंगोलीची हळद म्हणजे जगभरात नाव असलेले पिवळे सोने आहे.मात्र या सोन्याची लुट कोण करत आहे? बाजारातील मक्तेदारीमुळे व्यापारी आमच्या मालाची किंमत ठरवतात आणि शेतकरी हात चोळत बसतो.आम्ही रक्ताचे पाणी करून पीक घेतो आणि आम्हाला कवडीमोल दर मिळतो.ही लुट आता थांबली पाहिजे,”असा संतापही शेट्टी यांनी व्यक्त केला.

उसाच्या दराबाबत बोलताना त्यांनी कारखानदारांच्या नफ्यावर प्रश्न उपस्थित केला.“आमचा ऊस गळीताला जातो तेव्हा कारखानदार नफा कमावतात,मात्र उसाचा दर ठरवताना शेतकऱ्यालाच रांगेत उभे केले जाते.उसाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट दर आणि तोही वेळेत मिळाला पाहिजे.शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,घरखर्च आणि इतर गरजा भागवायच्या कशातुन?” असा सवाल त्यांनी केला.

“शेतकरी एकटा असेल तर त्याचा आवाज दाबला जाऊ शकतो,मात्र शेतकरी एकजुट झाला तर सरकारलाही झुकावे लागेल.आपल्या हक्कासाठी आणि आपल्या मातीच्या अस्मितेसाठी एकजुटीने लढुया,”असे आवाहन राजु शेट्टी यांनी केले.

शेतकऱ्यांचा लढा व्यापक करण्याचा निर्धार

हिंगोली जिल्हा शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी प्रास्ताविकातुन सरकारच्या धोरणांवर रोखठोक भाष्य केले.“आज आपण कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली जमा झालो नाही,तर आपल्या हक्कासाठी,आपल्या मातीच्या लेकरांसाठी आणि आपल्या घामाच्या किमतीसाठी एकत्र आलो आहोत.शेतकऱ्याचा आवाज आणि शेतकऱ्याचा हक्क ही घोषणा केवळ बॅनरवर राहु नये,म्हणुन हा एल्गार आहे,”असे ते म्हणाले.

“आपण कोणाकडे भीक मागत नाही,तर आपल्या हक्काची मागणी करत आहोत.गेली अनेक वर्षे आम्ही सहन केले,आता पाणी नाकापर्यंत आले आहे.सरकारच्या घोषणा आणि वास्तव यातील दरी आम्हाला सहन होत नाही.शेतकरी पेटुन उठला तर दिल्लीचे तख्तही हलतात.हा एल्गार केवळ हिंगोलीचा नसुन महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा आवाज आहे.त्यामुळे शक्तीपीठ रद्द,हळदीला योग्य भाव आणि उसाला रास्त दर मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही,”असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान,शक्तीपीठ महामार्गाच्या प्रश्नावर हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक भुमिका घेत असल्याचे या एल्गार परिषदेतुन स्पष्ट झाले.विकासाला विरोध नसला तरी विकासाची किंमत शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आणि ग्रामीण अस्तित्वाच्या विनाशातुन मोजली जाऊ नये,ही भुमिका यावेळी ठळकपणे मांडण्यात आली.

या एल्गार परिषदेस गिरीश फोंडे,किशोर ढगे,राजन क्षीरसागर,माधुरी क्षीरसागर,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,संदीप माटेगावकर,हनुमंत राजेगोरे,तानाजी भोसले,नवनाथ कुर्हे,ॲड.ऋषिकेश देशमुख,जुनेद पठाण,गोरख चव्हाण,पप्पु जाधव,डॉ.अजय मुंदडा,पुष्पक देशमुख,रावसाहेब अडकिने यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…म्हणुन हा एल्गार थांबणार नाही!

“गेली ८० वर्षे आम्ही केवळ आश्वासने ऐकली.शेतकरी राजा म्हणणाऱ्या व्यवस्थेने आम्हाला कर्जबाजारी आणि आत्महत्येच्या संकटात ढकलले.आम्ही अन्न पिकवतो म्हणुन देशाचे पोट भरते,मात्र आमच्या घरात दोन वेळचे अन्न शिजत नाही.ही विसंगती आता संपली पाहिजे.आमची सहनशीलता संपली आहे.त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द,हळदीची साठेबाजी थांबवुन हळदीला योग्य भाव आणि उसाला रास्त दर मिळाल्याशिवाय हा एल्गार थांबणार नाही,”असा इशारा शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी दिला.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement