Editor Choice Hingoli dist Maharashtra

लिंबाळा मक्ता येथील रोजगार सहाय्यक प्रकरण तापले,अपील मान्य असूनही रुजू न केल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह

राजकीय द्वेषातून कारवाईचा आरोप;कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर

हिंगोली /प्रतिनिधी
हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता गावातील रोजगार सहाय्यक शेख फैसल शेख लतीफ यांना ग्रामपंचायत कार्यालयाने राजकीय द्वेषातून व द्वेषभावनेतून सेवेतून कमी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.या प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,संबंधित कर्मचाऱ्याने न्यायासाठी विविध स्तरावर धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रोजगार सहाय्यकाने आपल्या कामकाजातील पारदर्शकता व प्रामाणिकपणाबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे अपील अर्ज सादर केला होता.या अर्जाची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आणि निष्कर्ष त्यांच्या बाजूने दिला.
मात्र,गटविकास अधिकाऱ्यांचा निर्णय असूनही संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतले नसल्याने वाद अधिकच चिघळला आहे.यानंतर संबंधित रोजगार सहाय्यकाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्याकडे दुसरा अपील अर्ज दाखल केला आहे.परंतु,अद्याप या अर्जावर कोणतीही ठोस कारवाई किंवा निर्णय झालेला नाही.
दरम्यान,गेल्या १० ते १२ वर्षांपासून गावातील लाभार्थ्यांची निस्वार्थपणे सेवा केल्याचे सांगत अनेक लाभार्थ्यांनीही गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे त्यांच्या कामाची प्रशंसा केली असल्याचे समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे संबंधित रोजगार सहाय्यक व त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले असून,उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.न्याय मिळत नसल्याची भावना तीव्र होत असल्याने त्यांनी टोकाची भूमिका घेण्याचे संकेत दिल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आता या प्रकरणात प्रशासन सत्याची बाजू घेणार की राजकीय दबावाला बळी पडणार,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून,संबंधितांना तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement