राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकाणू समिती सदस्य सचिन उषा विलास जोशी यांचे विशेष व्याख्यान
वसमत /प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात मुलांचा वाढता मोबाईल वापर ही पालकांसाठी गंभीर चिंतेची बाब बनली आहे.शाळांमधून दिला जाणारा मोबाईलवरील गृहपाठ,गुगलवर थेट उत्तरे शोधून लिहिण्याची वाढती प्रवृत्ती,तसेच वाढता स्क्रीन टाइम यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्या डोळ्यांवरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.“स्क्रीन टाइम वाढतोय,पण स्किल वाढत नाही” ही वस्तुस्थिती पालकांसमोर मोठे आव्हान उभी करत आहे.
याच पार्श्वभूमीवर पालकांना योग्य दिशा देण्यासाठी“एकविसाव्या शतकातील आधुनिक पालकत्व आणि शिक्षण”या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता,सुरमणी प्रा.दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह, वसमत येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.या सत्रात नाशिक येथील शिक्षण अभ्यासक व राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकाणू समितीचे सदस्य सचिन उषा विलास जोशी हे पालकांना सखोल व मार्गदर्शक असे विशेष व्याख्यान देणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगोली जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश काष्टे हे राहणार आहेत.
या मार्गदर्शन सत्रामध्ये मुलांचे योग्य संगोपन कसे करावे,स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कोणत्या,तसेच मुलांना केवळ माहितीच्या वापरापेक्षा कौशल्य विकासाकडे कसे वळवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.बदलत्या काळात पालकत्वाची दिशा कशी असावी,यावरही या सत्रात सखोल चर्चा होणार आहे.
आज अनेक पालक“मुलांचा मोबाईल काही केल्या सुटत नाही” या समस्येला सामोरे जात आहेत.त्यामुळे मुलांचा वेळ सकारात्मक व सर्जनशील उपक्रमांकडे वळवून त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी हे सत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
हा उपक्रम वसमत येथील प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाणारी लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.ज्या पालकांना आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवायचे आहे,त्यांनी या मार्गदर्शन सत्राला आवर्जून उपस्थित राहावे,असे आवाहन शाळेचे संस्थापक प्रा.डॉ. नामदेव दळवी यांनी आयोजक या नात्याने केले आहे.














Add Comment