Crime • Editor Choice • Maharashtra

देशी दारू दुकानात चाकुचा धाक दाखवुन १ लाख १८ हजारांची जबरी चोरी,दोन आरोपी जेरबंद

देशी दारू दुकानात चाकुचा धाक दाखवुन १ लाख १८ हजारांची जबरी चोरी,दोन आरोपी जेरबंद.

दिशा न्युज मराठी २४×७,(न्युज पोर्टल)

मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत 

स्थानिक गुन्हे शाखा परभणीची धडाकेबाज कारवाई,१ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त.

परभणी शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील देशी दारूच्या दुकानात चाकुचा धाक दाखवुन मॅनेजरला मारहाण करत काउंटरवरील १ लाख १८ हजार ५०० रुपयांची रोकड जबरीने चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा,परभणीच्या पथकाने अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे.पोलिसांनी आरोपींकडुन चोरीच्या रकमेपैकी १ लाख रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ८० हजार रुपये किमतीची पल्सर मोटारसायकल असा एकुण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,दि.१३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ०७ वाजण्याच्या सुमारास परभणी रेल्वे स्टेशनसमोरील निशांत जैस्वाल यांच्या मालकीच्या देशी दारूच्या दुकानात दोन अनोळखी इसम आले.त्यांनी दुकानातील मॅनेजरला चाकुचा धाक दाखवुन मारहाण केली आणि काउंटरवर ठेवलेली १ लाख १८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जबरीने चोरून घटनास्थळावरून पळ काढला.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विवीध कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडुन सुरू असताना गोपनीय बातमीदारामार्फेत पोलिसांना महत्त्वपुर्ण माहिती मिळाली.या गुन्ह्यात शेख शोएब उर्फ रईस,रा.दर्गा रोड,परभणी आणि बालाजी उर्फ मुगडाळ बाळ्या नामदेव साळवे,रा.अण्णाभाऊ साठे नगर,परभणी यांचा सहभाग असल्याची माहिती निष्पन्न झाली.हे दोन्ही आरोपी पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली.

दि.१४ नोव्हेंबर २०२६ रोजी अहिल्यानगर येथील बायपास परिसरात मिळालेल्या वर्णनाशी मिळतेजुळते दोन इसम पोलिसांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे वरीलप्रमाणे सांगितली.त्यानंतर त्यांना परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेत आणुन विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडे चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत सखोल विचारपुस केली असता त्यांनी चोरी केलेल्या रकमेपैकी १ लाख रुपये स्वतःजवळ असल्याचे सांगुन पोलिसांसमोर हजर केले.उर्वरित रक्कम खाण्या-पिण्यासाठी तसेच प्रवासाच्या तिकिटांसाठी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली बजाज कंपनीची लाल-काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल आरोपीच्या भावाने पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर केली होती.

त्यानुसार दोन पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी आरोपींकडुन १ लाख रुपये रोख आणि ८० हजार रुपये किमतीची पल्सर मोटारसायकल (क्रमांक एमएच २२ बीडी ४३४२) असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही उल्लेखनीय कामगिरी परभणीचे पोलीस अधीक्षक मा.श्री.पंकज कुमावत (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री.तानाजी चिखले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजेंद्र सरोदे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परीहार,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे,पोलीस अंमलदार सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,रंगनाथ दुधाटे,गजानन क्षीरसागर,हनुमान ढगे तसेच अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शिरीष तरडे यांनी या कारवाईत महत्त्वपुर्ण भुमिका बजावली.

या धाडसी कारवाईमुळे जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असुन,आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केल्याने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement