वसमत येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा,उद्देशिकेचे वाटप व भव्य रॅली सह सामुहिक उद्देशिका वाचन संविधानाच्या जयघोषाने शहर दुमदुमले
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
वसमत शहर व तालुक्यात ७७ वा भारतीय संविधान दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातुन उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सामुहिक संविधान उद्देशिकेचे वाचन,नागरिकांना उद्देशिकेचे वाटप तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य संविधान रॅली काढण्यात आली.संविधानाच्या मुल्यांचा जागर नागरिकांमध्ये निर्माण व्हावा,या उद्देशाने आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक,महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित संविधान रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.रॅलीपुर्वी उपनगराध्यक्ष राजकुमार एंगडे यांच्या हस्ते नागरिकांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.त्यानंतर संविधानाच्या जयघोषात रॅलीला सुरुवात झाली.
ही रॅली शिवाजी चौक,जुनी नगरपालिका,पोलीस स्टेशन कॉर्नर,गवळी मारुती मंदिर आणि बसस्थानक या शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली.रॅलीदरम्यान समता सैनिक दलाच्या वतीने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर विजय असो’,‘भारतीय संविधान दिनाचा विजय असो’,‘जय भीम’अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून मानवंदना देण्यात आली व रॅलीचा समारोप करण्यात आला.
यानंतर डॉ.सुनीती तेलगोटे यांनी सामुहिक संविधान उद्देशिकेचे वाचन केले.प्रमुख मार्गदर्शक सय्यद कुतुब सर यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद करताना भारतीय संविधानाच्या माध्यमातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला प्रदान केलेले हक्क,अधिकार, स्वातंत्र्य,समता आणि न्याय या मुल्यांवर प्रकाश टाकला.अध्यक्षीय समारोप बालाजी मोरे यांनी केला.
या कार्यक्रमाला यशवंतराव उबारे,ॲड.रणधीर तेलगोटे, उपनगराध्यक्ष राजकुमार एंगडे,ॲड.सखाराम आझादे,विजयकुमार एंगडे,खंडोजी पंडित,आर.एस.नंद,साहेबराव सरोदे,राहुल करवंदे,यादव चौरे,आकाश दातार,आनंद वाहेवळ,मिलिंद आळणे, विशाल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर सुर्यतळ यांनी केले,तर सुत्रसंचालन अंबादास इंगोले यांनी केले.
दरम्यान,योगा प्रतिष्ठान वसमतच्या वतीनेही डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी सुनील काळे यांनी सामुहिक संविधान उद्देशिकेचे वाचन केले,तर डॉ. एन.एन.कुंटे यांनी संविधान दिनाचे महत्त्व व संविधानातील मूल्यांबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला यशवंतराव उबारे,गौतम पारखे,भास्कर थोरात,अनिल पंडित,कांबळे,डॉ.तारू,नामदेव इंगोले,सम्राट गायकवाड,राहुल सुर्यवंशी,अमोल उबारे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधानातील न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या मुल्यांचा अंगीकार करून समाजात लोकशाहीची जाणीव अधिक दृढ करण्याचा संदेश या विविध कार्यक्रमांतुन देण्यात आला.














Add Comment