वसमत नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण यशस्वी,सर्व मागण्या मान्य नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती यांच्या मध्यस्थीला यश
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत
नियमित आणि सुरळीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी वसमत नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले उपोषण अखेर यशस्वी झाले आहे.प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलन अधिकृतपणे मागे घेण्यात आले.नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती आणि नगरसेवकांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हा तिढा सुटला असुन कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.
वसमत नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत व सुरळीत व्हावे,या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला होता.मात्र, मोर्चानंतरही प्रशासनाकडुन कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक सचिन दगडु, उपनगराध्यक्ष राजकुमार एंगडे आणि नगरसेवक गौतम वाहुळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.या शिष्टमंडळाने आंदोलक कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या.
युवा नेते कन्हैया बाहेती यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची मध्यस्थी केली.त्यांच्या पुढाकाराने झालेल्या चर्चेअंती नगर परिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.मागण्या मान्य झाल्याची खात्री पटल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले उपोषण अधिकृतपणे मागे घेतले.या यशामुळे कर्मचाऱ्यांनी शिष्टमंडळाचे आभार मानले आहेत.














Add Comment