आमदार राजुभैया नवघरे यांच्या पाठपुराव्याला यश,मंजुर ले-आऊटमधील भुखंडांच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा जिल्हाधिकाऱ्यांकडुन तीन महिन्यांची मुदतवाढ
भुखंडधारकांना मोठा दिलासा,अटी व शर्तींच्या अधीन राहुन दस्त नोंदणी करता येणार
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजुभैया नवघरे यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असुन,हिंगोली जिल्ह्यातील मंजुर विकास योजना व प्रादेशिक योजनेतील मंजुर ले-आऊटमधील भुखंडांच्या खरेदी-विक्री दस्त नोंदणीसंदर्भात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे.या भुखंडांच्या दस्त नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र ७/१२ उताऱ्यांच्या प्रक्रियेला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वसमतसह संपुर्ण हिंगोली जिल्ह्यातील भुखंडधारक,खरेदीदार व विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन दि.२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंजुर अभिन्यासातील भुखंडांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी कमी-जास्त पत्रकानुसार स्वतंत्र ७/१२ उतारा अद्ययावत केल्यानंतरच करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र,भुमी अभिलेख व महसुल विभागाकडुन आवश्यक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी लागणारा प्रशासकीय कालावधी लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होत होती.
ही बाब लक्षात घेऊन आमदार राजुभैया नवघरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली होती.त्यांच्या या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दि.१८ नोव्हेंबर २०२६ रोजी आदेश निर्गमित करून पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे.
या निर्णयानुसार,ज्या मंजुर अभिन्यासांचे स्वतंत्र ७/१२ उतारे अद्याप तयार झालेले नाहीत,अशा भुखंडांची दस्त नोंदणी करताना खरेदीदार व विक्रेत्यांना संबंधित विभागाकडुन कमी-जास्त पत्रकानुसार स्वतंत्र ७/१२ उतारा विहित मुदतीत अद्ययावत करून घेण्याबाबत स्वाक्षरीयुक्त हमीपत्र सादर करावे लागणार आहे.
तसेच संबंधित अभिन्यास सक्षम प्राधिकरणाकडुन रीतसर मंजुर असल्याची खात्री दुय्यम निबंधकांनी करणे आवश्यक आहे.स्वतंत्र ७/१२ उतारा तयार करण्यासाठी भुमी अभिलेख किंवा तहसील कार्यालयात अर्ज करून त्याची पोचपावती दस्त नोंदणीसोबत जोडणे बंधनकारक राहणार आहे.अर्जाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातही सादर करावी लागणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना सर्व तहसीलदार व भुमी अभिलेख विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आमदार राजुभैया नवघरे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या या तीन महिन्यांच्या मुदतवाढीमुळे अनेक दिवसांपासुन अडचणीत असलेल्या भुखंडांच्या खरेदी-विक्री व्यवहारांना दिलासा मिळणार आहे.नागरिकांची गैरसोय दुर करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार असुन,आमदारांच्या प्रयत्नांचे नागरिकांकडुन स्वागत होत आहे.














Add Comment