पत्रकार बांधव व डॉ.गंगाधर काळे यांच्या प्रयत्नांना यश,वसमत उपजिल्हा रुग्णालयातील बंद पडलेली डायलिसिस सेवा पुन्हा सुरू
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत
वसमत तालुक्यातील डायलिसिस रुग्णांसाठी आनंदाची बातमी असुन,मागील काही दिवसांपासुन बंद असलेली वसमत उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा पुन्हा सुरू झाली आहे.वसमत येथील डायलिसिस सेंटर दि.१२ नोव्हेंबर रोजी सकाळपासुन सुरू झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गंगाधर काळे यांनी दिली.तसेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ,वसमत व कळमनुरी येथील डायलिसिस सेंटर दि.१२ नोव्हेंबरपासुन सुरू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
मागील काही दिवसांपुर्वी अचानक वसमत उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा बंद झाल्याने तालुक्यातील किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते.नियमित डायलिसिस करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता.त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. तसेच उपचारासाठी इतर ठिकाणी जाण्याची वेळ येत होती.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन वसमत येथील पत्रकार बांधवांनी पुढाकार घेतला.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गंगाधर काळे यांनीही रुग्णांची अडचण समजुन घेत डायलिसिस सेवा पुर्ववत सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला.पत्रकार बांधव,डॉ.काळे आणि डायलिसिस रुग्णांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.
या पाठपुराव्याची शासनाने दखल घेत हिंगोली व परभणी जिल्ह्यातील संबंधित डायलिसिस सेंटरची सेवा सुरू करण्याबाबत तोंडी आदेश दिल्याची माहिती आहे.त्यानुसार वसमत उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डायलिसिस सेवा पुर्ववत सुरू झाल्यामुळे वसमत तालुक्यासह परिसरातील गरजु रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी उपचार मिळणार असल्याने रुग्णांचा प्रवासाचा त्रास व आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.
रुग्णांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नासाठी पत्रकार बांधवांनी घेतलेला पुढाकार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.गंगाधर काळे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरल्याने नागरिकांकडुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या कार्याबद्दल पत्रकार बांधव आणि डॉ.गंगाधर काळे यांचे सर्व स्तरांतुन अभिनंदन होत आहे.














Add Comment