Editor Choice • Good working • Maharashtra

पत्रकारांना शासनाकडुन घरकुलाचा लाभ मिळवुन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील – पंजाब नवघरे (पाटील)

पत्रकारांना शासनाकडुन घरकुलाचा लाभ मिळवुन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील – पंजाब नवघरे (पाटील)

पत्रकारांच्या हक्काच्या घरांसाठी व्हॉइस ऑफ मिडीयाचा पुढाकार,शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासह घरकुल योजनांचा लाभ मिळवुन देण्याची मागणी

दिशा न्युज मराठी २४×७

उप संपादक – सौ.वर्षा गिरीष देशमुख 

समाजातील विविध घटकांच्या समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवुन लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन महत्त्वपुर्ण भुमिका बजावणाऱ्या पत्रकारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.पत्रकारांना स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध व्हावे,यासाठी व्हॉइस ऑफ मिडीया पत्रकार संघटनेने पुढाकार घेतला असुन,पत्रकारांना घरकुलासाठी शासकीय जागा अथवा भुखंड उपलब्ध करून द्यावेत,तसेच शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ मिळवुन द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात दि.२७ नोव्हेंबर रोजी व्हॉइस ऑफ मिडीया वसमतच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी,वसमत यांच्यामार्फेत निवेदन सादर करण्यात आले.हे निवेदन व्हॉइस ऑफ मिडीया हिंगोली जिल्हाध्यक्ष पंजाब नवघरे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील पत्रकार बांधव सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या,सामाजिक प्रश्न,अन्याय-अत्याचार तसेच विविध जनहिताच्या विषयांना आपल्या लेखणीच्या माध्यमातुन वाचा फोडण्याचे काम करतात.शासनाच्या योजना,प्रशासनातील समस्या आणि जनतेच्या मागण्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार अहोरात्र कार्यरत असतात.मात्र,समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या अनेक पत्रकारांची आर्थिक परिस्थिती सामान्य असुन,स्वतःचे घर उभारण्यासाठी आवश्यक जागा व आर्थिक पाठबळ उपलब्ध नसल्याने त्यांना कुटुंबासह वास्तव्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ही बाब लक्षात घेऊन व्हॉइस ऑफ मिडीया पत्रकार संघटनेने पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न प्रशासनासमोर मांडला आहे.पत्रकारांना शासकीय नियमांनुसार घर बांधण्यासाठी जागा अथवा भूखंड उपलब्ध करून द्यावेत,पत्रकारांसाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा,तसेच प्रधानमंत्री आवास योजना व इतर लागु घरकुल योजनांचा लाभ पात्र पत्रकारांना मिळवुन द्यावा,अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली.

पत्रकारांच्या घराचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसुन त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याशी निगडित आहे.समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बनुन काम करणाऱ्या पत्रकारांना स्वतःच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागणे ही चिंतेची बाब असल्याचे जिल्हाध्यक्ष पंजाब नवघरे (पाटील) यांनी नमुद केले.पात्र पत्रकारांची यादी तयार करून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी,त्यांना घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र घरकुल योजनेबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“पत्रकारांना शासनाकडुन घरकुलाचा लाभ मिळवुन देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.पत्रकारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न मार्गी लागावा,यासाठी संघटनेच्या माध्यमातुन प्रशासन व शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल.पात्र पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येईल,”असे पंजाब नवघरे (पाटील) यांनी सांगितले.

तसेच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन करून पात्र पत्रकारांना न्याय द्यावा,अशी मागणीही निवेदनातुन करण्यात आली.यावेळी व्हॉइस ऑफ मिडीया वसमत संघटनेचे पदाधिकारी,सदस्य,पत्रकार बंधु व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी व्हॉइस ऑफ मिडीया संघटनेच्या वतीने वसमतचे उपविभागीय अधिकारी श्री.विकास माने यांना संविधानाची फ्रेम,डायरी व पेन भेट देऊन सन्मान करण्यात आला.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement