Hingoli dist Maharashtra Social work

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना ‘जावळ’ काढण्यासाठी निमंत्रण! प्रशांत लोखंडे थोरावेकर यांचे शासन-प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन.

वसमत ते गणेशपूर-थोरावा-कागबन-सारोळा मार्गाच्या दुरवस्थेविरोधात प्रशांत लोखंडे थोरावेकर यांचे अनोखे आंदोलन…
थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ‘जावळ’ काढण्याचे निमंत्रण!
पत्रिका सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल…
“रस्ता होईपर्यंत माघार नाही” — नागरिकांच्या संतापाला नवा आवाज

वसमत/प्रतिनिधी

वसमत तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आता आंदोलनाने एक वेगळे आणि धक्कादायक वळण घेतले आहे.प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनाच स्वतःच्या‘जावळ’काढण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.या अनोख्या आंदोलनाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
वसमत येथून गणेशपूर,थोरावा,कागबन आणि सारोळा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.विशेष म्हणजे,याच मार्गावर भव्य शासकीय स्त्री रुग्णालय असल्याने दररोज अनेक महिला उपचारासाठी आणि प्रसूतीसाठी या रस्त्याने प्रवास करतात.मात्र रस्त्याची बिकट अवस्था पाहता रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणेही मोठे आव्हान बनले आहे.
या गंभीर प्रश्नाकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रशांत लोखंडे यांनी यापूर्वी अनेक वेळा निवेदने दिली.एवढेच नव्हे,तर पावसाळ्यात खड्ड्यात साचलेल्या घाण पाण्यात बसून‘पुस्तक वाचो’आंदोलन करूनही प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला त्या वेळी संबंधितांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले होते;मात्र बराच कालावधी उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिक,विद्यार्थी, शेतकरी,वाहनचालक आणि रुग्ण यांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः गणेशपूर,थोरावा,कागबन आणि सारोळा या गावांमधून एखादा गंभीर रुग्ण तातडीने दवाखान्यात आणायचा असल्यास, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर,स्थानिक यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा निषेध म्हणून प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी आता स्वतःच्या जावळ काढण्याच्या कार्यक्रमाची पत्रिका छापून एक वेगळाच आंदोलनात्मक संदेश दिला आहे.या पत्रिकेत थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले असून,संबंधित रस्त्याचे महत्त्व शासनाच्या प्रतिनिधींना समजावे आणि तातडीने दखल घ्यावी,हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे अनोखे आंदोलन दि.११ एप्रिल २०२६,शनिवार रोजी मौजे सारोळा ता.वसमत येथे आयोजित करण्यात आले आहे.या आंदोलनाद्वारे वसमत–गणेशपूर–थोरावा–कागबन–सारोळा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता तातडीने दुरुस्त करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात,अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.
“जोपर्यंत रस्त्याबाबत ठोस उपाययोजना होत नाहीत,तोपर्यंत माघार घेणार नाही,”असा इशाराही प्रशांत लोखंडे यांनी दिला आहे.त्यामुळे आता या अनोख्या आंदोलनाकडे केवळ वसमत तालुक्याचेच नव्हे,तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement