Maharashtra Social work Vasmat city

वसमत येथील प्रभाग क्र.१२ चा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांसह नगरसेवकांचे महावितरणला निवेदन.

मुख्य संपादक: गिरीष देशमुख

वसमत शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील मोंढा पाॅवरलुम,जनता मार्केट,सिराज कॉलनी,वडारवाडा व रेल्वे स्टेशन रोड परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक व नागरिकांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन सादर केले.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,संबंधित भागातील महावितरणची वीजपुरवठा व्यवस्था पुर्णपणे विस्कळीत झाली असुन अनेक ठिकाणी विद्युत खांब वाकलेले आहेत.त्यामुळे विद्युत तारा धोकादायकरीत्या लोंबकळत असुन वादळी वाऱ्याच्या वेळी स्पार्किंग होण्याच्या घटना घडत आहेत.परिणामी मोठ्या वीज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

यापूर्वी अशाच प्रकारच्या वीज अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याचे नागरिकांनी निवेदनात नमुद केले आहे.या गंभीर समस्येबाबत नागरिक व लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा महावितरणच्या निदर्शनास सदरील बाब आणुन दिली असली तरी अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या दीड महिन्यापासुन वारंवार वीजपुरवठा खंडित होत असुन तीव्र उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.तसेच परिसरातील डीपी व अन्य विद्युत यंत्रणांची देखभाल-दुरुस्तीही तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाकलेले विद्युत खांब बदलुन विद्युत तारा सुरक्षित अंतरावर हलविण्यात याव्यात तसेच संभाव्य वीज अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा,अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.

येत्या आठ दिवसांत या प्रश्नांवर कार्यवाही न झाल्यास नगरसेवक व नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

सदर निवेदनावर प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेविका सौ.उत्कर्षा कन्हैया बाहेती,सचिन विठ्ठल दगडु तसेच परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Featured

Advertisement

Advertisement